भोपाळ - मध्यप्रदेशात भोपाळमध्ये एका बालसुधारगृहात पुन्हा एकदा अक्षम्य बेपर्वाईचे प्रकरण समोर आले आहे. आठ बाल गुन्हेगारांनी कोणलाही थांगपत्ता लागू न देता सुधारगृहाच्या खिडकीचे गज तोडून पलायन केले आहे. जहांगीराबाद परिसरात हे बालसुधारगृह आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
बालसुधारगृहात सकाळी जेव्हा मुलांची संख्या मोजण्यात आली, तेव्हा आठ मुले हजर नसल्याचे आढळून आले. यानंतर चौकशी केली असता, ही मुले रात्री गज तोडून पळून गेल्याचे लक्षात आले. पळालेल्यांपैकी बहुतेकजण चोरीच्या प्रकरणात सापडलेले आरोपी आहेत. तर, दोघा अल्पवयीनांवर हत्येचे गुन्हे दाखल आहेत. ही सर्व मुले याच वर्षी बालसुधारगृहात आणण्यात आली होती. यातील दोन मुले ४ डिसेंबरलाच येथे आणण्यात आली होती.
या बालसुधारगृहात 40 मुले आहेत. मात्र, त्यांच्या सुरक्षेसाठी फक्त एकच वयस्कर सुरक्षारक्षक आहे. हा एकच सुरक्षारक्षक 24 तासांची ड्यूटी करत आहे. याआधीही या बालसुधारगृहातील बेपर्वाईच्या अनेक घटना समोर आल्या होत्या. मात्र, येथील व्यवस्था सुधारण्यात आलेली नाही.
संबंधित अधिकारी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच, यावरती काहीही बोलण्यास तयार नाहीत. इतकेच नाही तर, या सुधारगृहाच्या मुख्य दरवाज्याला सध्या टाळे लावण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकरणात 'खिडकीचे गज कापण्यासारखे साहित्य या बालसुधारगृहात मुलांच्या हातापर्यंत पोहोचले कसे' हा सर्वांत मोठा प्रश्न अनुत्तरित रहात आहे.