नवी दल्ली - स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने जुन्या दिल्लीत मोठ्या प्रमाणात पतंग उडवले जातात. मात्र, पतंग उडवताना चिनी मांजाचा उपयोग केला जात असल्याने पक्षांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. या वर्षी चिनी मांजामुळे मोठ्या प्रमाणात पक्षी जखमी झाले असून काही पक्षांना आपला जीव गमवावा लागला आहे.
दिल्ली सरकारने २०१७ मध्ये चिनी मांजावर बंदी आणली होती. तरीही, बाजारात मांजाची उघडपणे विक्री होत असल्याचे दिसून येते.
पतंग उडवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या चिनी मांजामुळे जुन्या दिल्लीत सर्वाधिक पक्षी जखमी झाल्याची नोंद आहे. चिनी मांजाच्या संपर्कात आल्याने पक्षांचे पंख, मान आणि पाय यावर गंभीर जखमा झाल्या आहेत. आकाशात उडताना मांजाचा अडथळा आल्याने सर्वाधिक पक्षी जखमी होतात.
चिनी मांजा स्ट्रेचेबेल असल्याने तो लवकर तुटत नाही. त्यामुळे आपला पतंग कटू नये यासाठी या मांजाचा उपयोग केला जातो. चिनी मांजा हा नायलॉनपासून बनवला जातो आणि या मांजावर काच आणि लोखंडाचे कण लावले जातात. पक्षी जेव्हा या चिनी मांजाच्या संपर्कात येतात, तेव्हा हा मांजा स्ट्रेचेबल असल्याने तुटत नाही. उलट पक्षांच्या शरीराला कापतो. याउलट देशी मांजा पक्षांच्या शरीरात अडकला तरी तुटतो आणि पक्षांना जखमही होत नाही.
जुन्या दिल्लीतील चांदणी चौकात असलेल्या चॅरीटी बर्ड रुग्णालयात १३ आणि १५ ऑगस्ट च्या दरम्यान चिनी मांजामुळे ७०० हून अधिक पक्षी जखमी झाल्याचे नोंद आहे. ज्यामध्ये २००हून अधिक पक्षी गंभीर जखमी झाल्याने मृत झाले.