नवी दिल्ली - उत्तर प्रदेशातील क्वारंटाईन सेंटरमधून 600 तबलिगी सदस्यांना सोडण्यात आले आहे. त्यांचा क्वारंटाईन कालावधी संपल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली आहे. यामध्ये लखनऊमधील 157 जमाती सदस्याचा समावेश होता. उत्तर प्रदेश आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.
उर्वरित सदस्यांना क्वारंटाईन कालावधी संपल्यानंतर सोडण्यात येईल. ज्या जमात्यांना प्रवासाच्या नियमांचे उल्लंघन आणि इतर बाबींसाठी ताब्यात घेण्यात आले होते, त्यांना जामीन मिळाल्यानंतरच सोडण्यात येईल, असे अतिरिक्त मुख्य सचिव अवनीश अवस्थी यांनी सांगितले. तसेच गुरुवारी जवळपास 296 जमाती सदस्यांना मेरठमधून सोडण्यात आले आहे. दरम्यान तबलिगी जमाती सदस्यांना जास्त काळ क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आल्याचा दावा समाजवादीचे आमदार रफिक अन्सारी यांनी केला होता.
भारतातील कोरोना साथीच्या आजारामुळे 5 हजार 700 हून अधिक लोकांना संसर्ग झाला आहे. दिल्लीतील निजामुद्दीन येथे 'मरकज' हा धार्मिक प्रार्थनेचा कार्यक्रम 13 मार्च ते 15 मार्चदरम्यान आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात शेकडो लोक सहभागी झाले होते. यातील काही जणांना कोरोनाची लागण झाली होती. अनेकांचा मृत्यू झाला आहे. कार्यक्रमामध्ये सहभाग घेतलेल्या तबलिगी जमातीच्या सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याने संक्रमित लोकांची संख्या झपाट्याने वाढली आहे.