नांदेड - एआयएमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी नेहमीच वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहतात. आता त्यांनी त्यांच्या मुस्लीम भाऊबंदांविषयी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. '२०१४ मध्ये आणि २०१९ मध्ये मोदी सरकार सत्तेत आले. या दोन्ही वेळेस त्यांना ६ टक्के मुस्लिमांनी मतदान केले. हे '६' काय आहे? क्रिकेटच्या भाषेत '६'ला 'छक्का' असे म्हटले जाते,' असे विधान ओवेसी यांनी केले आहे. यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
ओवेसी यांनी त्यांच्या भाषणातून मोदी सरकारवर तोफ डागली आहे. सोबतच त्यांनी मोदींना २०१४ आणि २०१९ मधील लोकसभा निडणुकांमध्ये मतदान करणाऱ्या मुस्लिमांवरही खालच्या पातळीवर जाऊन टीका केली आहे. यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या जाण्याची शक्यता आहे. यावर भाजपचे अमित मालवीय यांनीही ट्विटद्वारे टीका केली आहे.
भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी ओवेसीच्या वक्तव्यावर प्रश्न उपस्थित केले आहे. २०१९ मधील लोकसभा निडणुकांमध्ये मोदींना मत देणाऱ्या मुस्लीम लोकांची आपण अशा प्रकारे संभावना केली आहे तर, मग हैदराबाद आणि औरंगाबादमध्ये ज्या हिंदूनी तुम्हाला आणि इम्तियाज जलील यांना मतदान केले,त्यांच्याबद्दलही तुमचे हेच विचार आहेत काय, असा सवाल मालवीय यांनी या टि्वटमध्ये म्हटले आहे.
![6% Muslims who voted for PM Modi and BJP in 2014 and 2019 are eunuchs as per Owaisi](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/4709202_ov.jpg)
ओवैसी नांदेड दक्षिण आणि उत्तर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार साबेर चाऊस व फेरोज लाला यांच्या प्रचारासाठी नांदेडमध्ये आले होते. यावेळी त्यांनी भाजपवर टीका केली आहे.