लखनऊ - उत्तर प्रदेशच्या ग्रेटर नोएडामध्ये झालेल्या एका अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. रविवारी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. धुक्यामुळे समोरचा रस्ता न दिसल्याने ही गाडी थेट कालव्यात पडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारुती कंपनीच्या अर्टिगा या गाडीमधून ११ लोक प्रवास करत होते. ग्रेटर नोएडाच्या दनकौर भागातून जाताना धुक्यामुळे रस्ता न दिसल्याने, ही गाडी थेट खेरली कालव्यामध्ये पडली. स्थानिकांनी तातडीने गाडीतील सर्वांना रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्यातील ६ जणांना मृत घोषित केले. उरलेल्या पाच जणांवर उपचार सुरू आहेत.
हे सर्व संबल जिल्ह्यातील रहिवासी होते. त्यांच्यासोबत आणखी एका गाडीमध्ये काही लोक होते. हे सर्व मिळून दिल्लीला जात होते. मृतांमध्ये महेश (३५), किशन लाल (५०), नीरेश (१७), राम खिलाडी (७५), मल्लू (१२) आणि नेत्रपाल (४०) यांचा समावेश आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, उत्तर भारतात थंडीचा कहर सुरू आहे. उत्तर रेल्वेच्या ३० गाड्या या धुक्यामुळे उशिरा धावत आहेत. तसेच दिल्ली विमानतळावरील तीन विमानांचे मार्ग बदलण्यात आले आहेत.
हेही वाचा : 'राहुल -प्रियांका यांना अंमली पदार्थांचे व्यसन' साध्वी प्राचीचे वादग्रस्त विधान