हैदराबाद- देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. काल (5 जुलै) भारतात 52 हजार 509 कोरोना रुग्ण सापडल्याने कोरोना रुग्णांचा एकूण आकडा 19 लाखाच्या पार गेल्याची माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे देण्यात आली आहे.
वाढत्या रुग्ण संख्येबरोबरच कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येतही वाढ दिसून येत आहे. देशातील एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ही 12 लाख 82 हजार 215 झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, देशात सलग सातव्या दिवशी 50 हजारापेक्षा जास्त कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.
नवी दिल्ली- दिल्ली उपराज्यपालांनी, प्रदेश सरकारच्या 1 ऑगस्टपासून हॉटेल्स आणि आठवडी बाजारांना सुरू करण्याच्या आदेशाला फेटाळले आहे. दरम्यान, अनलॉक-3 मध्ये फेरीवाल्यांना 1 ऑगस्टपासून अधिक काळ व्यवसाय करू देण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे.
महाराष्ट्र- राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढतच असला तरी आज अखेर राज्यात 3 लाख कोरोना रुग्ण बरे झाल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली. काल दिवसभरात ६ हजार १६५ रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर १० हजार ३०९ नवीन रुग्णांची नोंद झाली. राज्यात आज ३३४ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.
आतापर्यंत राज्यभरात ३ लाख ५ हजार ५२१ रुग्ण बरे झाले असून त्याची टक्केवारी ६५.२५ इतकी आहे. तर सध्या १ लाख ४५ हजार ९६१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. तसेच, राज्यात एकूण 10 हजार पोलिसांना कोरोना झाला आहे. त्यातील 107 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
मध्यप्रदेश- मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना कोरोनाची लागण झाली होती. ते आता बरे झाले असून त्यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. डॉक्टरांनी त्यांना गृह विलगीकरणात राहण्याचे सांगितले आहे.
तेलंगाणा- काल राज्यात 2 हजार 12 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 13 जणांना सुट्टी झाली आहे. काल सापडलेल्या रुग्णांमुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही 70 हजार 958 झाली आहे. तर कोरोना मृत्यूंची संख्या 576 आहे.
उत्तराखंड- अलमोरा तुरुंग व्यवस्थापनाने नव्या कैद्यांसाठी जिल्ह्यातील आकाशवाणी केंद्रातील कर्मचारी क्वार्टर्समध्ये तात्पुरते तुरंग निर्माण केले आहे. नव्या कैद्यांमुळे मुख्य तुरुंगातील कैद्यांना कोरोनाची लागण होऊ नये यासाठी या तुरुंगाची निर्मिती करण्यात आली आहे.
ओडिशा- मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी बेरहामपूर येथील एसकेसीजी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय व विमसार एम.सी.एच येथे प्लाझ्मा बँकचे उद्घाटन केले आहे.
जम्मू काश्मीर- 2019 या वर्षी राज्यात जम्मू काश्मीर प्रदेशात बीएसएफ आणि सीआयएसएफच्या 1 हजार 356 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मात्र, कोरोना संकटामुळे लेखी परिक्षा रद्द करण्यात आली होती. ही परिक्षा राज्यातील परिस्थिती सामान्य झाल्यावर घेण्यात येईल, अशी माहिती आयटीबीपी आणि बीएसएफचे महासंचालक एस.एस देसवाल यांनी दिली.
हेही वाचा- महाविद्यालयांकडून अतिरिक्त शुल्काची वसुली सुरूच; अखेर उच्च शिक्षण संचालकांनी घेतली दखल