मथुरा - बोअरवेलमध्ये १०० फूट खोल पडलेल्या ५ वर्षांच्या चिमुरड्याला बाहेर काढण्यात अखेर यश आले. रविवारी दुपारी हा चिमुरडा बोअरवेलमध्ये पडला होता. बचाव पथकाच्या ८ तासांच्या प्रयत्नांनतर या मुलाला जीवदान मिळाले आहे. प्रवीण असे या मुलाचे नाव आहे.
झाडावरील फळे तोडण्याच्या प्रयत्नात असताना तो अचानकपणे या बोअरवेलमध्ये पडला. रविवारी दुपारी हा प्रकार घडला. एनडीआरएफचे असिस्टंट कमांडर अनिल कुमार सिंग यांनी बचाव कार्याची माहिती दिली. 'या मुलाला बोअरवेलबाहेर काढण्यासाठी आम्हाला अनेक तास लागले. यासाठी लष्करानेही आम्हाला मदत केली,' असे ते म्हणाले.
सध्या या मुलाला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. मथुरेचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी शेर सिंह यांनी याविषयी माहिती दिली. 'हा मुलगा अगदी ठणठणीत आहे. त्याच्या तब्येतीची काहीही तक्रार नाही. मात्र, खबरदारी म्हणून त्याला काही औषधे देण्यात आली आहेत. त्याला रात्रभर रुग्णालयातच ठेवले असून उद्या घरी पाठवण्यात येईल,' असे त्यांनी सांगितले.
मुलगा बोअरवेलमध्ये पडल्याचे समजताच स्थानिक अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच, त्याला वाचवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश दिले, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.