चेन्नई - तामिळनाडूतील जयराज आणि बेनिक्स या पिता-पुत्रांच्या मृत्यूनंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्यात आले आहे. या प्रकरणी 5 पोलिसांना 2 दिवसांची सीबीआय कोठडी देण्यात आली आहे. तुतिकोरोनी जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी जयराज आणि बेनिक्स या पिता-पुत्रांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. पोलीस कोठडीतील मारहाणीमुळे दोघांचा मृत्यू झाल्याचा आरोप पोलिसांवर आहे.
जिल्हा सत्र न्यायाधीश हेमंत कुमार यांनी पोलीस निरिक्षण, दोन उपनिरिक्षक आणि इतर दोन कर्मचाऱ्यांना 2 दिवसाची सीबीआय कोठडी मंजूर केली आहे. सर्व कर्मचारी संथनकूलम पोलीस ठाण्याचे कर्मचारी आहेत. मागील आठवड्यात गुन्हे शाखेकडून सीबीआयने खटला हाती घेतला आहे. दोघांच्या मृत्यूनंतर राज्यात संतापाची लाट उसळली असून दोषी पोलिसांवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.
सीबीआयने 7 दिवसांची कोठडी न्यायालयाकडे मागितली होती. मात्र, आरोपी पोलिसांच्या वकीलाने सात दिवसांची कोठडी देण्यास विरोध दर्शवला. त्यानंतर न्यायालयाने दोन दिवसांची कोठडी मंजूर केली आहे.
पोलीस निरिक्षक श्रीधर, उपनिरिक्षक रघु गणेश आणि बालकृष्णण यांच्यासह दोन पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल आहे. मध्यवर्ती तुरुंगात पाचही आरोपींची रवानगी केली असून त्यांना न्यायालयात आज आणण्यात आले होते. सीबीआयचे अतिरिक्त पोलीस अधिक्षक या प्रकरणाची चौकशी करत आहेत. 22 आणि 23 जूनला पोलीस कोठडीतून जयराज आणि बेनिक्सला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचा आरोप पोलिसांवर ठेवण्यात आला आहे.