नवी दिल्ली - देशभरात मॉब लिंचिंगच्या वाढत्या घटनांविरोधात सेलिब्रेटींनी आवाज उठवला आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहत चिंता व्यक्त केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून देशभरात मॉब लिंचिंगच्या घटना वाढल्या असून त्यात अनेक जणांचा बळी गेला आहे. या घटनांमुळे व्यथित झालेल्या विविध क्षेत्रातील 49 मान्यवरांनी एकत्र येत पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. यामध्ये मणिरत्नम, अडूर गोपालकृष्णन, रामचंद्र गुहा, अनुराग कश्यप यांच्यासह कला, साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील 49 जणांचा समावेश आहे.
'जय श्रीराम'च्या नावाखाली दलित, मुस्लीम आणि वंचित समाजातील लोकांना मारहाण करून ठार मारले जात आहे. या घटना थांबवण्यासाठी कठोर पाऊल उचलण्यात यावीत. देशामध्ये निर्माण होणाऱ्या असंतोषाचे दमन न होता त्याला मोकळी वाट मिळेल अश्या प्रकारचे वातावरण तयार करुन देशाला एक प्रबळ राष्ट्र बनावावे, अशी विनंती मान्यवरांनी पत्राद्वारे मोदींकडे केली आहे. या पत्रावर नरेंद्र मोदी काय उत्तर देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.