गुवाहाटी (आसाम)- कोरोना लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याप्रकरणी राज्यातील पोलिसांनी गेल्या ३८ दिवसात ३ हजार ६७३ नागरिकांना अटक केली आहे, अशी माहिती काल राज्य पोलिसांनी दिली. अटक केलेल्या नागरिकांकडून १ कोटी ६२ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
आपल्या दैनिक अहवालात राज्य पोलिसांनी सांगितले की, लॉकडाऊनच्या सुरुवातीपासूनच २ हजार ५३२ घटनांप्रकरणी १ हजार ६९० गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. तसेच, राज्यातील विविध भागातील २२ हजार ३६४ वाहन आणि बोटींना ताब्यात घेण्यात आले आहे. त्याचबरोबर, खोट्या बातम्यांविषयीदेखील राज्य पोलिसांनी कृतीयुक्त कारवाई केली आहे. खोट्या बातम्या पसरविणाऱ्या ९४ नागरिकांविरुद्ध राज्य पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून ४९ नागरिकांना अटक केली आहे.
त्याचबरोबर, राज्यातील १२ जिल्ह्यांमधील २७ ठिकाणांना पूर्णत: बंद करण्यात आले असून या ठिकाणांना प्रशासनाने कंन्टेनमेंट झोन म्हणून घोषित केले आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने आतापर्यंत १० हजार ८७५ कोरोना नमुन्यांची चाचणी केली असून त्यापैकी ४२ नागरिक कोरोनाबाधित असल्याचे समोर आले आहे. तसेच, कोरोनामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून ३२ नागरिक कोरोनामुक्त झाल्याचे समजले आहे.