नवी दिल्ली - चार भारतीय दूतावासांसह ३१ भारतीयांना अफगानीस्थानची राजधानी काबूलमधून सोमवारी दिल्ली येथे आणण्यात आले. त्यानंतर त्यांना आयटीबीपीअंतर्गत दिल्लीतील चावला कॅम्पमध्ये क्वारंनटाईन करण्यात आले आहे.
जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. तसेच देशात कोरोनाबाधितांची संख्या बाराशेच्या पुढे पोहोचला आहे. त्यामुळे संपूर्ण देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन आहे. तसेच परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यातच सोमवारी आलेल्या ३१ जणांना दिल्ली येथे क्वारंनटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. सर्वांना आयसोलेशन बेड्स, अॅम्बुलन्स यासह सर्व प्राथमिक सुविधा पुरवल्या असून त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात येणार आहे. सर्व ३१ जणांना १४ दिवसांपर्यंत क्वारंनटाईनमध्ये ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्या स्वॅब चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्यास त्यांना सोडण्यात येईल. तसेच सध्या आयटीबीपीच्या कॅम्पमध्ये ४७८ जण क्वारंनटाईन आहेत, असे आयटीबीपीकडून सांगण्यात आले आहे.