नवी दिल्ली - देशभरामध्ये कोरोनाचे 3 हजार 374 रुग्ण आढळून आले असून काल (शनिवार) दिवसभरात 472 रुग्ण आढळून आले. आत्तापर्यंत 79 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 267 रुग्ण पूर्णत: बरे झाले आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी दिली.
देशभरातील 174 जिल्ह्यामध्ये कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. राज्य सरकार संचारबंदी काळात नियमांचे पालन करत आहेत. अत्यावश्यक वस्तू आणि सेवांचा पुरवठा समाधानकारक आहे, असे गृह मंत्रालयाच्या संयुक्त सचिव पुन्या श्रीवास्तव यांनी सांगितले. कोरोनाचा विषाणू हवेतून पसरत असल्याचा पुरावा आत्तापर्यंत हाती आला नसल्याचे आयसीएमआरने म्हटले आहे.
27 हजार 661 आसरा गृहे सर्व राज्यांमध्ये स्थापन करण्यात आली आहेत. यातील 23 हजार 924 सरकारी असून 3 हजार 737 स्वयंसेवी संघटनांद्वारे स्थापन करण्यात आली आहेत. तर 12 लाखांपेक्षा जास्त नागरिक या निवार गृहांमध्ये राहत आहेत, अशी माहिती श्रीवास्तव यांनी दिली. 75 हजार नागरिकांना अन्न पुरविण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.