लखनऊ - उत्तर प्रदेशच्या शहाजहांपूरमध्ये शालेय पोषण आहार खाऊन २६ मुले आजारी पडल्याची घटना घडली आहे. शालेय पोषण आहारामध्ये मुलांना दूध आणि खिचडी देण्यात आली होती. त्यानंतर, घरी गेल्यावर मुलांची तब्येत बिघडण्यास सुरूवात झाली. मुलांना पोटदुखी आणि उलटीचा त्रास सुरु झाला. यामुळे एक मुलगी बेशुद्ध देखील झाली. त्यानंतर सर्व मुलांना नजीकच्या सरकारी इस्पितळात दाखल करण्यात आले. मुलांवर आता उपचार सुरु आहेत.
भटीयुरा बहलोलपुर प्राथमिक विद्यालयात हा प्रकार घडला. आजारी पडलेली सर्व मुले एकाच गावातील आहेत. स्थानिक शिक्षणाधिकारी राकेश कुमार यांनी शाळेला आणि इस्पितळाला भेट देऊन झालेल्या प्रकाराची माहिती घेतली. तसेच शाळेतील पोषण आहाराच्या तपासणीचे आदेश त्यांनी दिले आहेत.