दुर्ग - कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अनेकजण लॉकडाऊनमुळे विविध ठिकाणी अडकून पडले आहेत. त्यामुळे आपल्या गावी जाण्यासाठी बरेच जण पायदळ वारी करत आहेत. गुजरातमधून पायदळ प्रवास करणाऱ्या झारखंडच्या २१ मजुरांना दुर्ग येथील एका आश्रयस्थळी ठेवण्यात आले आहे. हे सर्व मजुर झारखंडला जाण्यासाठी पायदळ निघाले होते. १८ एप्रिल पासून हे मजुर पायदळ प्रवास करत आहेत. त्यांना पोलिसांनी अडवून आता एका ठिकाणी थांबवून ठेवले आहे.
या सर्व मजुरांची स्क्रिनिंग केल्यानंतर त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे. हे सर्व मजुर गुजरातच्या अहमदाबाद येथील एका इमारतीच्या बांधकामासाठी गेले होते. लॉकडाऊननंतर त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था होत नसल्याने ते आपल्या राज्यात परत जाण्यासाठी निघाले होते. लॉकडाऊनमुळे एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यातही प्रवास करता येत नाही. अशा परिस्थितीत या मजुरांनी छत्तीसगढच्या दुर्गपर्यंत पायी प्रवास केला आहे.
दुर्ग जिल्ह्यात या मजुरांच्या राहण्याची पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. गुजरात आणि महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या जास्त असल्याने गुजरातमधून आलेल्या या मजुरांमुळे कोरोनाच्या संसर्गाची भीती निर्माण झाली आहे. आता यापैकी कोणतीही मजुर कोरोना पॉझिटिव्ह निघाला, तर पुन्हा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.