नवी दिल्ली - देशभरातील २१ विमानतळांवर प्रवाशांचे थर्मल स्कॅनिंग करण्यास सुरूवात केली आहे. चीनमधील कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर ही खबरदारी घेण्यात आली आहे. या विषाणूमुळे चीनमध्ये आतापर्यत तब्बल १७० लोकांचा बळी घेतला आहे.
याआधी देशातील काही विमानतळांवर अशा प्रकारचे स्कॅनिंग सुरू करण्यात आले होते. आता या विमानतळांमध्ये वाढ करण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. यामध्ये दिल्ली, हैदराबाद, मुंबई, कोची, बंगळुरु, अहमदाबाद, अमृतसर, कोलकाता, कोईंबतूर, गुवाहाटी, गया, बगदोगरा, जयपूर, लखनऊ, चेन्नई, तिरुवअनंतपुरम, तिरुचिरापल्ली, वाराणसी, विशाखापट्टणम, भुवनेश्वर आणि गोवा या विमानतळांचा समावेश आहे.
दरम्यान, आरोग्य आणि परिवार कल्याण मंत्रालयातील विशेष सचिव संजीव कुमार यांनी नेपाळच्या सीमेवर असणाऱ्या राज्यांमधील परिस्थितीचा आढावा घेतला. उत्तराखंड, बिहार, पश्चिम बंगाल, सिक्कीम राज्यांच्या आरोग्य सचिवांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केंद्रीय आरोग्य सचिवांना आपापल्या राज्यांमधील सुरक्षा व्यवस्थेचा अहवाल दिला.
राज्य सरकारने आपापल्या राज्यांमध्ये यासंबंधी खबरदारीचे उपाय लागू करावेत. तसेच, स्थानिक माध्यमांची मदत घेऊन लोकांमध्ये याबाबत जनजागृती करावी, असे निर्देश कुमार यांनी दिले आहेत. तसेच, विमानांमध्येही या आजाराबाबत घोषणा करून लोकांना त्याची लक्षणे आणि खबरदारीचे उपाय यांची माहिती देण्यात यावी, असे आवाहन त्यांनी केले.
हेही वाचा : 'कोरोना'चा कहर : चीनमध्ये १७० बळी; सात हजारांहून अधिकांना संसर्ग..