हैदराबाद - ट्रॅव्हल एजंटच्या फसवणुकीमुळे २० जण सौदी अरोबियात अडकल्याची माहिती समोर आली आहे. हे सर्वजण रमजानच्या पवित्र महिन्यात 'उमराह'साठी गेले होते. या प्रवाशांच्या नातेवाईकांनी तक्रार केली आहे.
'या सर्व प्रवाशांना ट्रॅव्हल एजंटने फसवले आहे. त्यानेच सर्वांच्या मक्का, मदिना येथे जाण्या-येण्यासह राहण्याची, जेवणाची व्यवस्था केली होती. यासाठी प्रत्येकाकडून ६२ हजार रुपये घेतले होते. मात्र, कोणतीही व्यवस्था करण्यात आली नाही,' अशी माहिती शेख इब्राहिम यांनी दिली आहे. त्यांचे वडील शेख खलील, आई फाहमीदा बेगम, आजी कासीम बी हे सर्वजण सौदी अरबियात अडकून पडले आहेत.
'या सर्वांनी तेथील प्रशासनाला संपर्क साधून मक्का येथील 'तेलंगणा स्टे होम' येथे तात्पुरती राहण्याची व्यवस्था केली आहे. २५ जणांपैकी आतापर्यंत ५ जण परत आले आहेत. बाकी सर्वांकडे परतीसाठी पैसे नसल्याने ते तेथेच अडकले आहेत,' असे इब्राहिम यांनी सांगितले.
'या लोकांपैकी काहींचे व्हिसा संपत आले आहेत. मी केंद्र सरकारला या लोकांची सौदी अरेबियातून सुटका करण्यासाठी मदतीचे आवाहन करीत आहे,' अशी विनंती त्यांनी केली आहे.