नवी दिल्ली - मादक पदार्थ नियंत्रण विभागातील पथकाने दोन नायजेरियन नागरिकांना अटक केली आहे. दोन्ही नागरिकांकडे 15 किलो एफेड्रिन आणि 260 ग्राम हेरॉईन हे मादक पदार्थ होते. हे पदार्थ पथकाने जप्त केले आहेत.
केनेडी (वय 36 रा. उत्तमनागर नवी दिल्ली) व अचुकूवू (वय 33 रा. महरौली) असे अटक झालेल्या आरोपींची नावे आहेत. अटक केलेल्या आरोपींचे संबंध एका ड्रग तस्करी संघाशी असून या संघाची पाळेमुळे दिल्ली-एनसीआर, पंजाब, हिमांचल प्रदेश, मुंबई आणि नायजेरिया मध्ये पसरली आहेत. तपासात अटक केलेल्या आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचेही समोर आले आहे.
अटक केलेल्या नागरिकांनी व्हिसा निकषांचे उल्लंघन आणि बोगस ओळखपत्रांचे वापर केल्याची माहिती समोर आली आहे. अटक केलेल्या आरोपींची मादक पदार्थ नियंत्रण विभागाकडून कसून चौकशी केली जात असून त्यांच्या एका सहकाऱ्याचा शोधही घेतला जात आहे.