डेहराडून - हौसेला मोल नसते, हेच खरे! त्यात लग्नासारखा प्रसंग असेल आणि खर्च करण्याची ऐपत असेल तर, हौसेला आणि त्यावरील खर्चाला सुमारच नसतो. सर्वांसाठी लग्न हा हौस पुरवण्याचा हक्काचा इव्हेंट बनला आहे. अशाच उत्तराखंडमधील उद्योगपती गुप्ता बंधूंच्या मुलांच्या लग्नाचीही जोरदार तयारी करण्यात आलीय. लग्नासाठी तब्बल २ किलो चांदीची लग्नपत्रिका तयार केलीय.
भारतीय वंशाचे आणि दक्षिण अफ्रिकेत स्थायिक झालेले उद्योगपती गुप्ता बंधू सध्या चर्चेत आहेत. त्यांच्या मुलांचा औली येथे विवाह होणार आहे. या लग्नाची लग्नपत्रिका एकदम खास बनवण्यात आली आहे. ती २ किलो चांदीची असून किंमत जवळपास ८ लाख रुपये आहे. याच्या आत चांदीच्या ६ प्लेटस् आहेत. यावर लग्नातील सर्व कार्यक्रम लिहिण्यात आले आहेत. प्रत्येक कार्यक्रम हिंदी आणि इंग्रजीत लिहिला आहे.
या लग्नामध्ये पर्यावरणाचे नुकसान होणार नाही, याचीही काळजी घेण्यात आली असल्याचे गुप्ता कुटुंबीयांकडून सांगण्यात येत आहे. दिल्लीच्या एका कंपनीला लग्नाच्या तयारीची जबाबदारी देण्यात आली आहे. 'लग्नानंतर कोणताही कचरा औलीमध्ये तसाच टाकण्यात येणार नाही. तसेच, लग्नामधील सजावटीसाठी औलीमध्ये ४० हजार रोपटी आणि झुडपे मागवण्यात आली आहेत,' असे कंपनीने म्हटले आहे.