लखनऊ - मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, असे म्हटले जाते. याचाच प्रत्यय अयोध्येतील एका १२ वर्षीय मुलामुळे समोर येत आहे. या मुलाने १२ वर्षाच्या वयातच ४ जागतिक विक्रम आपल्या नावे नोंदवून देशात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. या मुलाच्या या विक्रमाबद्धल जाणून घेऊया ईटीव्ही भारतच्या या रिपोर्टद्वारे.
मृगेंद्र राज असे या मुलाचे नाव आहे. त्याने वयाच्या १२ व्या वर्षी १३५ पुस्तके लिहून ४ जागतिक विक्रम आपल्या नावे नोंदवली आहेत. यासंदर्भात बोलताना मृगेंद्रने सांगितले, की मला सामाजिक विषयावर लिहायला खूप आवडते. मी माझे पहिले पुस्तक काव्याच्या रूपात लिहिले होते. या कवितांद्वारेच मी वाचण्यास आणि लिहिण्यास सुरुवात केली. ६ वर्षापूर्वी मला 'उद्भव' या कवितासंग्रहासाठी पहिले अवॉर्ड मिळाले.
आतापर्यंत मी १३५ पुस्तके लिहिली आहेत. त्यातील 'रामायण के ५१ किरदार' आणि योगी आदित्यनाथ यांच्यांवर लिहिलेले 'कर्मयोगी' हे पुस्तक मला खूप आवडते. सध्या माझे पूर्ण लक्ष रामायणमधील पात्रांवर पुस्तके लिहिण्यात आहे. कारण माझ्या नावे होणारा ५ वा विक्रम हे रामायणमधील अधिक पात्रावर पुस्तके लिहिण्यासाठी आहे. त्यासाठीच मी यासंदर्भात सगळीकडून साहित्य जमा करत असल्याचे मृगेंद्रने सांगितले.
गणित हा माझा आवडता विषय आहे. तर मला आईएफएस व्हायचे आहे. तसेच लंडनच्या एका विद्यापीठातून मला डॉक्टरेटची पदवी देण्यासाठी ऑफर आहे. परंतु, त्यासाठी आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याचे यावेळी मृगेंद्रने सांगितले.
मृगेंद्रची आई डॉ. शक्ती पांडेय सुलतानपूरमधील महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. परंतु, मुलाला चांगले आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी त्यांनी मृगेंद्रला आपल्या वडिलांसोबत अयोध्येत ठेवले. मृगेंद्रबद्धल बोलताना त्या सांगतात, की प्रत्येक आईला आपली मुले यशस्वी होताना बघायचे असते. मृगेंद्रच्या या यशाबद्धल मला खूप अभिमान वाटते. तो जेव्हा दीड वर्षाचा होता तेव्हापासूनच त्याला वेदमंत्र आणि पूजापाठ करायला आवडत असे. याबाबत त्याची तीव्र बृद्धी आणि इच्छा पाहून आम्हीही त्याला प्रोत्साहन दिले.
वयाच्या १२ व्या वर्षात १३५ पुस्तके लिहणाऱ्या या अवलियाला सध्या आर्थिक चणचण जाणवत आहे. तर प्रत्येक विक्रम नोंदवण्यात जेवढे पैसे लागले ते सर्व आम्ही कर्ज काढून खर्च केले. आता पुन्हा ५ वा विक्रम रचण्यासाठी पैशाचा प्रश्न समोर उभा, असल्याचे मृगेंद्रचे वडिल राजेश पांडेय यांनी सांगितले.