बंगळुरु - बुधवारी देशभरात ख्रिसमस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ख्रिसमसचे निमित्त साधून काँग्रेसचे आमदार डी. के. शिवकुमार यांनी 114 फुट उंच येशू ख्रिस्ताच्या मूर्तीचे लोकार्पण केले. रामनगर जिल्ह्यातील हरोबेले या गावात ही भव्य मूर्ती उभारण्यात आली आहे.
हेही वाचा - सूर्यग्रहण अन् अंधश्रद्धा : कर्नाटकातील या गावात दिव्यांगाना पुरतात जमिनीत
हरोबेले गावातील कपाली बेट्टा डोंगरावर येशूची मूर्ती उभारण्यासाठी शिवकुमार यांनी स्वत:च्या निधीतून 10 एकर जमीन गावकऱ्यांना दिली आहे. बुधवारी ख्रिसमसच्या दिवशी आमदार डी. के. शिवकुमार आणि खासदार डी. के. सुरेश यांनी या जमिनीची कागदपत्रे ख्रिश्चन ट्रस्टला हस्तांतरित केली. हरोबेले या गावात 90 टक्के पेक्षा जास्त लोक हे ख्रिश्चन समुदयाचे आहेत. नाताळ सणाच्या दिवशी शिवकुमार यांनी या लोकांना ही भेट दिली. या वेळी प्रार्थना कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते.