तिरुवअनंतपुरम - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केरळमध्ये अडकलेल्या ११२ फ्रेंच नागरिकांना मायदेशी रवाना करण्यात आले आहे. एअर इंडियाच्या विशेष विमानाने त्यांना फ्रान्सला पाठवण्यात आले, अशी माहिती विमानतळ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारताने राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानसेवा बंद केली आहे. तसेच देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. त्यामुळे फ्रान्सहून भारतात आलेले पर्यटक केरळमध्येच अडकले होते. या नागरिकांना मायदेशी पाठवण्यासाठी एअर इंडियाने विशेष विमानाची सोय केली होती. बंगळुरूहून निघालेले हे विशेष विमान शनिवारी सकाळी केरळमधील कोची विमानतळावर दाखल झाले. तेथून फ्रेंच नागरिकांना घेऊन ते फ्रान्सला रवाना झाले आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये याप्रमाणेच जर्मन आणि ओमानच्या काही नागरिकांनाही केरळहून मायदेशी पाठवण्यात आले आहे. हे परदेशी नागरिक पर्यटनासाठी किंवा विशेषतः आयुर्वेदिक उपचारांसाठी केरळला आले होते. कोरोनामुळे लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे ते इथेच अडकले होते. यापुढेही राज्यात अडकलेल्या परदेशी नागरिकांना परत पाठवण्यासाठी आपण तयार असल्याची माहिती कोची विमानतळ प्रशासनाने दिली आहे.
फ्रान्समध्ये कोरोनाचे सुमारे ६५ हजार रुग्ण आढळून आले आहेत. तर आतापर्यंत देशात कोरोनामुळे सुमारे साडे सहा हजार नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
हेही वाचा : COVID-19 : जगभर कोरोनाचे थैमान.. 10 लाख 98 हजार संक्रमित; ५९ हजार दगावले