भोपाळ - मध्यप्रदेशात गणपती विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागले आहे. भोपाळ शहरामधील खटलापुरा घाटावर बोट उलटल्याने ११ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. बोटीमधील ६ जणांना वाचवण्यात यश आले आहे. तर आणखी २ जण बेपत्ता आहेत. राज्य आपत्ती निवारण पथकाने बचाव आणि मदत कार्य हाती घेतले आहे.
बोटीमध्ये क्षमतेपक्षा जास्त लोक बसल्यामुळे बोट बुडाल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. याप्रकरणी २ बोट चालकांवर जहांगीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोटीमधून मूर्ती विसर्जनाला नेत असताना संतूलन बिघडल्यामुळे एक बोट बुडाली. त्यामुळे लोकांनी दुसऱ्या बोटीवर उड्या घेतल्या. त्यामुळे दुसरी बोटही बुडाली. याबाबतचा एक व्हिडिओ प्रत्यक्षदर्शीने चित्रित केला आहे. त्यामध्ये बोट बुडाल्याची घटना स्पष्ट दिसत आहे.
बुडालेल्या ११ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. गणपती विसर्जनाला आलेले सर्वजण पिपलानी येथील क्वार्टर ११०० मधील रहिवासी होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस महानिरीक्षक आणि पोलीस उप-महानिरीक्षक घटनास्थळी दाखल झाले आहेत. मुख्यमंत्र्यानी या घटनेचे उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. गणपती विसर्जनासाठी दिलेली वेळ नागरिकांनी पाळली नसल्याचेही तपासात पुढे आले आहे.
राज्याचे मंत्री पी. सी शर्मा घटनास्थळी आले आहेत. मदत कार्य आणि बचाव कार्याचा त्यांनी आढावा घेतला. जिल्हाधिकाऱ्यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ४ लाख रुपये देणार असल्याची घोषणा केली आहे, असे शर्मा यांनी सांगितले. ही दुखद घटना असून याची चौकशी केली जाईल, असेही शर्मा म्हणाले.