पणजी - ब्रिटीश तरुणी स्कार्लेट किलींग या तरुणीच्या हत्येप्रकरणी शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात सुनावणी घेण्यात आली. यावेळी न्यायलयाने दोषी सॅमसन डिसोझा याला १० वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सुनावली.
गेल्या २००८ मध्ये ब्रिटिश तरुणी स्कार्लेट किलींग (१५)चा उत्तर गोव्यातील अंजुणा समुद्र किनारी मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर चौकशीअंती पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले होते. बालन्यायालयाने दोघांनाही निर्दोष मुक्त केले होते. मात्र, या निकालाला सीबीआयने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर बुधवारी १७ तारखेला न्यायालयाने निर्णय देत एकाची निर्दोष मुक्तता केली. तर सॅमसन डिसोझा या आरोपीला दोषी ठरवले होते. यावर आज गोवा खंडपीठाने सुनावणी घेत दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतले.
न्यायालयात शुक्रवारी आरोपीच्या वकिलांनी शिक्षा कमी करण्याची मागणी केली होती. तर तक्रारदाराच्यावतीने अॅड. विक्रम वर्मा यांनी गुन्ह्याचे स्वरूप विचारात घेत जास्तीत जास्त शिक्षेची मागणी केली. त्यानंतर न्यायालयाने आज दुपारी ३ वाजता आरोपी डिसोझाला १० वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा सुनावली.
काय होते प्रकरण?
नैसर्गिक नियमाने मोठ्यांनी लहानांचे रक्षण केले पाहिजे. मात्र, गोव्यात उलट झाले होते. गेल्या २००८ मध्ये ब्रिटीश तरुणी स्कार्लेट किंलींग या अल्पवयीन मुलीला अंमलीपदार्थ देण्यात आले होते. त्यानंतर तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, ती पळून जाण्याचा प्रयत्न करीत होती. तरीही तिला परत आणून तिच्यावर अत्याचार करण्यात आला. त्यानंतर तिचा मृतदेह समुद्रकिनारी आढळून आला होता. गेल्या दहा वर्षांपासून हा खटला सुरू होता. मात्र, आज खऱ्या अर्थाने त्या पीडितेला न्याय मिळाला आहे.