हैदराबाद - माओवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य सुधाकरण आणि त्याच्या पत्नीने आत्मसमर्पण केले आहे. सुधाकरणच्या डोक्यावर १ कोटींचे बक्षिस पोलिसांनी जाहीर केले होते. काही दिवसांपूर्वी तेलंगणा पोलिसांच्या समोर या दोघांनी आत्मसमर्पण केले, असे म्हटले जात आहे. मात्र, पोलिसांनी याबद्दल अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही.
सुधाकरण मागील अनेक दिवसांपासून फरार होता. त्याच्या सक्रिय घडामोडींमुळे पोलीस त्याच्या मागावर होते. मात्र, अनेक वेळा प्रयत्न करूनही तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता. त्यानंतर त्याने अचानक आत्मसर्पण केल्यामुळे पोलीसही गोंधळात आहेत.
कोण आहे सुधाकरण -
सुधाकरण नक्षलवादी असून मओवादी केंद्रीय समितीचा सदस्य आहे. त्याला सुधाकरण, ओगू सतवाजी, बरयार, किरण इत्यादी बनावट नावांनीही ओळखले जाते. तो तेलंगणाच्या आदिलाबद येथील रहिवासी आहे. त्याचे कार्यक्षेत्र झारखंड असून तेथे त्याने अमाफ संपत्ती गोळा केली आहे, असे म्हटले जाते. गृह विभागाच्या आदेशानंतर त्याच्यावर १ कोटींचे बक्षिस पोलिसांनी जाहीर केले आहे. तर त्याची पत्नी नीलिमा हिच्या डोक्यावर २५ लाख रुपयांचे बक्षिस आहे.
नक्षलवाद्यांना मोठा धक्का -
केंद्रीय समितीच्या सदस्यानेच आत्मसर्पण केले म्हणून माओवादी संघटनांना धक्का बसला आहे. त्याच्या आत्मसमर्पणानंतर नक्षलवाद्यांचे अनेक गुपित बाहेर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नक्षलवाद्यी कारवायांना याचा फटका बसेल. तर, सुधाकरण याने तेंदुपत्ता व्यापाऱ्यांकडून गलेलठ्ठ पैसे उकळले आहेत. ज्याचा उपयोग करून त्याने सहकाऱ्यांच्या मदतीने उद्योग करण्यास सुरुवात केली होती.