राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज 80 वा वाढदिवस
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज (12 डिसेंबर)ला 80 वा वाढदिवस आहे. शरद पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राज्यात अनेक ठिकाणी जय्यत तयारी केली जात आहे. शरद पवार यांचा जन्म 12 डिसेंबर 1940 रोजी पुणे जिल्ह्यातील बारामतीमध्ये झाला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ते देशाचे कृषीमंत्री असा पल्ला गाठणाऱ्या शरद पवार यांचं राष्ट्रीय राजकारणातील स्थान अढळ आणि महत्त्वाचं आहे.
आज होणार महाशरद पोर्टलचे उद्घाटन
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते महाशरद पोर्टलचे उद्घाटन होणार आहे. शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून दिव्यांग व्यक्तींसाठी महाशरद नावाचे पोर्टल आणि विविध योजनांच्या माहितीसाठी पुण्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेकडून ई-बार्टी नावाचे ॲप लाँच केले जाणार आहे, अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज औरंगाबाद दौरा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (12 डिसेंबर) औरंगाबाद जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते औरंगाबाद शहर पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन तसेच विविध विकास कामांचा शुभारंभ होणार आहे.
खासदार संभाजी राजे पुण्यातील सारथी संस्थेच्या बाहेर ‘तारदूत’ आंदोलनाला भेट देतील
सारथी संस्थेतील तारादूत प्रकल्पावरील स्थगिती उठवून तारादूतांना नियुक्त्या द्याव्यात व या प्रकल्पाची व्याप्ती वाढवून प्रकल्पाला गती द्यावी, या मागण्यांसाठी महाराष्ट्रभरातील तारादूतांचे पुणे येथे कार्यालयात ठिय्या आंदोलन चालू आहे. गेले पाच दिवस हे आंदोलन चालू असुन खासदार संभाजी राजे आज या आंदोलनाला भेट देतील.
स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती
भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची आज (ता.12) जयंती आहे. यानिमित्ताने दरवर्षी गोपीनाथ गड येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यंदा मात्र, कोरोनामुळे गोपीनाथ गडावर मोठा कार्यक्रम होणार नाही, असं गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या अध्यक्षा, भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडें यांनी सांगितलं आहे.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी तीन दिवसांच्या पुणे दौर्यावर
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी शुक्रवारी (ता.12) तीन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आले आहेत. शनिवारी आणि रविवारी त्यांच्या उपस्थितीत शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
आजपासून शेतकऱ्यांचे देशव्यापी आंदोलन
कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी आंदोलनाचा आज सतरावा दिवस आहे. आजपासून (ता.12) शेतकरी देशव्यापी आंदोलन सुरू करीत आहेत. दरम्यान, शेतकऱ्यांनी रस्त्यावरील लढा आता सर्वोच्च न्यायालयात नेला आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत दोन दिवसांच्या पश्चिम बंगाल दौर्यावर
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत आज (12 डिसेंबर) पासून दोन दिवसांच्या पश्चिम बंगाल दौर्यावर आहेत
सुपरस्टार रजनीकांत यांचा आज वाढदिवस.
दक्षिण चित्रपटसृष्टीचे सुपरस्टार, थलाईवा यांसारख्या बिरुदावली मिरवणारे अभिनेते रजनीकांत यांचा आज वाढदिवस आहे. आज ते 70 वर्षांचे झाले आहेत. रजनीकांत यांचा वाढदिवस त्यांच्या देशभरातील कोट्यवधी चाहत्यांसाठी एखाद्या सण-उत्सवापेक्षा कमी नसतो. रजनीकांत यांचं खरं नाव शिवाजीराव गायकवाड आहे. 12 डिसेंबर 1950 ला बंगळुरुतील मराठी कुटुंबात त्यांचा जन्म झाला.
सिक्सर किंग युवराज सिंहचा आज 39 वा वाढदिवस
सिक्सर किंग युवराज सिंहचा आज 39 वा वाढदिवस आहे. 12 डिसेंबर 1981 रोजी चंदीगडमध्ये जन्मलेल्या युवराजने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरीही लोकांच्या हृदयातलं त्याचं स्थान अजूनही कायम आहे. 2007 मध्ये क्रिकेटच्या इतिहासातील पहिल्या टी-20 विश्वचषकमध्ये युवीने इंग्लंडचा गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या एकाच षटकात सहा षटकार ठोकले आणि अवघ्या 12 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. आजवर जागतिक क्रिकेटमध्ये युवीचा हा विक्रम कोणताही फलंदाज मोडू शकलेला नाही.