जयपूर Rajasthan CM : राजस्थानमधील नव्या मुख्यमंत्र्यांबाबतचा सस्पेन्स आता संपला आहे. सांगानेरमधून आमदार झालेले भजन लाल शर्मा राजस्थानचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. मंगळवारी विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याशिवाय दिया कुमारी आणि प्रेमचंद बैरवा यांना उपमुख्यमंत्री बनवण्यात आलंय. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी भजन लाल शर्मा यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. या नावाला सर्व आमदारांनी सहमती दर्शवली. अजमेर उत्तरचे आमदार वासुदेव देवनानी यांना विधानसभा अध्यक्ष बनवण्यात आलं आहे.
अनेक वर्षांपासून पक्ष संघटनेत कार्यरत : भरतपूर येथील रहिवासी भजन लाल शर्मा गेल्या अनेक वर्षांपासून पक्ष संघटनेत कार्यरत आहेत. त्यांनी प्रदेश सरचिटणीस म्हणून काम केलंय. ते जयपूरच्या सांगानेर येथून पहिल्यांदाच आमदार बनले. विद्यमान आमदार अशोक लाहोटी यांचं तिकीट कापून भजन लाल शर्मा यांना उमेदवारी देण्यात आली होती. सांगानेर ही जागा भाजपाचा बालेकिल्ला आहे. अशा स्थितीत, संघटनेतील त्यांची महत्त्वाची भूमिका लक्षात घेऊन त्यांच्यावर मुख्यमंत्रिपदाची मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.
वसुंधरा राजे यांची सहमती : भाजपा हायकमांडनं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, विनोद तावडे आणि सरोज पांडे यांना राजस्थानचे निरीक्षक म्हणून नियुक्त केलं होतं. मंगळवारी दुपारी तिन्ही नेत्यांनी जयपूरला पोहोचून आमदारांची बैठक घेतली. राजनाथ सिंह यांची माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्याशी वन टू वन बैठक घेतली. दुसरीकडे, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनीही राजनाथ सिंह यांच्याशी फोनवर चर्चा केली.
'ही' नावं चर्चेत होती : राजस्थानमध्ये बहुमत मिळवल्यानंतर भाजपासमोर सर्वात मोठं आव्हान होतं मुख्यमंत्रीपदी कोणाची निवड करायची. या शर्यतीत अनेकांची नावं होती. यादीत पहिलं नाव होतं वसुंधरा राजे यांचं. त्यांनी या आधीही राज्याची जबाबदारी सांभाळली आहे. याशिवाय राजस्थानमध्ये हिंदुत्वाचे पोस्टर बॉय बनलेले बाबा बालक नाथ यांच्या नावाचीही चर्चा होती. तसेच केंद्रीय मंत्री गजेंद्र शेखावत, सीपी जोशी, दिया कुमारी आणि राज्यवर्धन राठोड यांची नावंही स्पर्धेत होती.
११५ जागांवर विजय मिळवला : छत्तीसगड आणि मध्यप्रदेश प्रमाणेच भाजपाने राजस्थानमध्येही मुख्यमंत्र्याच्या चेहऱ्याशिवाय निवडणूक लढवली. या निवडणुकांमध्ये भाजपाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावे मतं मागून विजय मिळवला. विधानसभा निवडणुकीत राजस्थानमधील २०० पैकी १९९ जागांवर मतदान झालं. यापैकी भाजपानं ११५ जागांवर विजय मिळवला, तर काँग्रेसला केवळ ६९ जागा जिंकता आल्या.
हे वाचलंत का :