हल्दवानी - उत्तराखंडमध्ये १४ फेब्रुवारीला मतदान आहे. याआधी लालकुवान विधानसभेच्या जागेवर भाजपाला धक्का बसला आहे. उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या नातेवाईक असलेल्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा माया कोश्यारी यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत समर्थकांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
लालकुआन जागा हॉट सीट
लालकुआन विधानसभा जागा राज्यातील सर्वात हॉट सीट आहे. काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही पक्षांसाठी ही जागा प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. विजय मिळविण्यासाठी काँग्रेस सातत्याने भाजपामध्ये घुसखोरी करत आहे. याअंतर्गत काँग्रेस सातत्याने भाजपाच्या लोकांना आपल्या पक्षात सामावून घेत आहे. भाजपा पूर्व मंडल अध्यक्ष मंगळवारी काँग्रेसमध्ये सामील झाल्यानंतर काँग्रेसने रात्री उशिरा पुन्हा भाजपला मोठा धक्का दिला आहे.
माया कोश्यारी काँग्रेसमध्ये सामील
उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे नातेवाईक आणि बिंदूखट्टा भाजपा महिला मोर्चाच्या दोन वेळा अध्यक्ष राहिलेल्या माया कोश्यारी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. माया कोश्यारी यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत सहा माजी पदाधिकाऱ्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला. माजी मुख्यमंत्री आणि लालकुआन मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार हरीश रावत यांनी त्यांचा काँग्रेसमध्ये समावेश केला आहे. माया कोश्यारीसह काँग्रेसमध्ये भाजपा महिला माजी सरचिटणीस दीपा बोरा, मंत्री सुमन बोरा आणि कार्यकारिणी सदस्य किरण बिश्त यांचा समावेश आहे. काँग्रेस उमेदवार हरीश रावत यांच्यावर विश्वास व्यक्त करत या महिला नेत्यांनी भाजपा सोडली आहे. यावेळी लालकुवान मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार हरीश रावत म्हणाले की, लोक भाजपला कंटाळले आहेत आणि ते बदल शोधत आहेत. त्यामुळे लोक आता भाजप सोडून काँग्रेसमध्ये येत आहेत.