बंगळुरू - गेल्या सहा महिन्यांपासून कोरोना विषाणूने जगभारामध्ये थैमान घातले होते. लॉकडाऊन, नियमांचे पालन करून कोरोनाचे संकट कमी होत असतानाच आता एका नव्या कोरोनाने डोकेदुखी वाढवली आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार आढळून आला आहे. या नव्या प्रकारच्या विषाणूला रोखण्यासाठी भारतासह अनेक देशांनी ब्रिटनमधून येणारी विमान थांबवली आहे. भारतात या नव्या कोरोनाने शिरकाव केला आहे. इंग्लंडवरून परतलेल्या बंगळुरुमधील तिघांना नव्या कोरोनाची लागण असल्याचे समोर आले आहे.
दोन महिला आणि एका पुरुषाला नव्या कोरोनाची लागण झाली आहे. संबधित पुरुष रुग्ण जे.पी नगरमधील आहे. तर संबधित दोन महिलांमध्ये आई-मुलीचे नाते आहे. त्या दोघी नुकतचं इंग्लंडवरून परतल्या आहेत. बृहन बंगळुरू महानगरपालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून संबधित तीन्ही रुग्णांचे अपार्टमेंट सील केले आहे. तर पुढील 28 दिवस संपूर्ण परिसर स्वच्छ ठेवण्यात येणार असून निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे. विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी संबधित इमारतीमधील इतर लोकांचीही चाचणी घेण्यात आली आहे.
इमारतीमधील इतर रहिवाशांनी कोरोनाची नकारात्मक चाचणी आल्यानंतर क्वारंटाईन राहण्यास नकार दिला आहे. मात्र, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी बृहन बंगळुरू महानगरपालिकेने इमारत सील केली आहे. इमारतीमधील रहिवाशांना जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी बीबीएमपीशी संपर्क साधण्यास सांगितले आहे.
कोरोना टास्क फोर्सची बैठक -
इंग्लडहून भारतात आलेल्या काही प्रवाशांना कोरोना असल्याचे चाचणीत स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या सर्वांना अलगीकरणात ठेवण्यात येत आहे. मात्र, तरीही काही प्रवासी विमानतळावरून फरार झाले होते. त्यामुळे काही प्रमाणात नागरिकांना याचा धोका निर्माण झाला आहे. राष्ट्रीय स्तरावरील कोरोना टास्क फोर्सची बैठक झाली. या बैठकीत नवा कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्याची रणनिती आखण्यात आली. तसेच कोरोना चाचणी, नियमावली, रुग्णांची निगराणी यासंबंधी आढावा घेण्यात आला. ब्रिटनमध्ये सापडलेला नवा कोरोना विषाणू जास्त घातक असून त्याचा प्रसार वेगाने होत असल्याचे पुढे येत आहे. त्यामुळे जर एखादा प्रवासी नव्या विषाणूने बाधित असेल तर त्याला शोधून त्याच्या हालचालींवर नियंत्रण आणण्यास प्रशासनाकडून प्राधान्य देण्यात येत आहे.
हेही वाचा - YEAR ENDER 2020 : कोरोना महामारीच्या काळात तीन राज्यात रंगलेले सत्तानाट्य !