अनेकल (कर्नाटक) Bengaluru Godown Fire : कर्नाटकातील बेंगळुरू इथल्या अनेकल येथं शनिवारी संध्याकाळी फटाक्यांच्या गोदामाला भीषण आग लागली. या अपघातात ११ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले. अथिबेले सीमेवर असलेल्या बालाजी क्रॅकर्स फटाक्यांच्या गोदामात ही घटना घडली. एका छोट्या ठिणगीमुळे संपूर्ण गोदामाला आग लागल्याचं पोलिसांनी सांगितलं. पोलीस अपघातातील मृतांची ओळख पटवण्यात व्यस्त आहेत.
आग लागण्याच्या वेळी गोदामात २० कर्मचारी होते : पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आग लागण्याच्या वेळी फटाक्याच्या गोदामात सुमारे २० कर्मचारी होते. अपघाताच्या वेळी उपस्थित २० लोकांपैकी चार जण आपला जीव मुठीत घेऊन पळाले. फटाक्यांच्या गोदामात अजूनही काही जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी आतापर्यंत सात मृतदेह ताब्यात घेतले आहेत. गोदामाला लागलेली आग अद्याप पूर्णपणे आटोक्यात आलेली नाही. लॉरीमधून फटाके उतरवले जात असताना हा अपघात झाल्याचं काही लोकांचं म्हणणं आहे. या अपघातात काही वाहनांना आग लागल्याचंही समोर आलंय.
आणखी कर्मचारी अडकले असण्याची भीती : या संपूर्ण घटनेबाबत बेंगळुरू ग्रामीणचे एसपी मल्लिकार्जुन बालदंडी यांनी सांगितलं की, बालाजी क्रॅकर्स गोदामात कॅंटर वाहनातून फटाके उतरवताना हा अपघात झाला. काही वेळातच गोदामाला आग लागली. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. सध्या ८० टक्के आगीवर नियंत्रण मिळवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. या घटनेत गोदामाचे मालक नवीन हे देखील भाजले आहेत. आग पूर्णपणे विझल्यानंतरच गोदामात किती कर्मचारी अडकले आहेत हे कळेल. एफएसएल टीम पडताळणीसाठी येईल. आम्ही गोदामाचा परवाना तपासत आहोत, असं बेंगळुरू ग्रामीणच्या एसपींनी सांगितलं.
हेही वाचा :