नवी दिल्ली : बिहारमधील बाहुबली नेता अशी ओळख असलेले माजी खासदार शहाबुद्दीन यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. दिल्लीतील तिहार तुरूंगातील कैदेदरम्यानच त्यांना कोरोनाची लागण झाली होती. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.
दीन दयाल उपाध्याय रुग्णालयात शनिवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. काल सायंकाळपासूनच त्यांची प्रकृती गंभीर होती. डॉक्टरांनी सकाळी त्यांना तपासून मृत घोषित केले. शहाबुद्दीन हे तिहार तुरूंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत होते. कोरोनाची लागण झाल्यानंतर आठवडाभरापूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून त्यांची प्रकृती सातत्याने खालावत होती. दरम्यान, त्यांचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी कुटुंबियांना देण्यासंदर्भातील कायदेशीर बाबींची पूर्तता केली जात असल्याचे समजते आहे. तिहार तुरुंगातील पाच कैद्यांचा आठवडाभरातच कोरोनाने मृत्यू झाला आहे.