छतरपूर (मध्यप्रदेश): बागेश्वर धामचे पुजारी पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या धाकट्या बंधूंचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये पंडित धीरेंद्र शास्त्री यांचा भाऊ शालिग्राम गर्ग एका लग्न समारंभात लोकांना शिवीगाळ करताना आणि कट्ट्याने धमकावताना दिसत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 11 फेब्रुवारीला दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास गऱ्हा गावात दलित समाजाचे सामूहिक विवाह होत होते. पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा धाकटा भाऊ लग्न समारंभात पोहोचला आणि तेथील लोकांना शिवीगाळ करून मारहाण केली.
समारंभात लग्नास नकार दिल्याने संताप: एका फेसबुक यूजरने हा व्हिडिओ आणि काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आणि लिहिले की, बाबा धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा भाऊ तिथे पोहोचला आणि भांडण सुरू केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दलित समाजातील एका कुटुंबाने धाम येथे होणाऱ्या विवाह सोहळ्यात लग्न करण्यास नकार दिला होता. त्यामुळे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे भाऊ संतापले होते. संतापलेल्या भावाने घरातील सदस्यांना शिवीगाळ करत पिस्तूल दाखवून मारहाण केली. ज्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. ईटीव्ही भारत या व्हायरल व्हिडिओची पुष्टी करत नाही.
पोलिसांकडून घटनेचा तपास सुरु: व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारा मुलगा बागेश्वर धामचे पुजारी पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा धाकटा भाऊ आहे. व्हिडिओमध्ये तोंडात सिगारेट, हातात पिस्तूल आणि मारामारी करताना दिसत आहे. या प्रकरणाबाबत छतरपूरचे एसपी सचिन शर्मा म्हणाले की, व्हिडिओ समोर आल्यानंतर तपास पथक तयार करण्यात आले आहे. व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती कोण आहे आणि घटना कुठे घडली याचा तपास करून कारवाई केली जाईल. नुकतेच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे देखील नुकतेच बागेश्वर धाम येथे पोहोचले होते. शिवराज सिंह चौहान हे सामूहिक विवाहात सहभागी झाले होते. यावेळी याठिकाणी 121 जोडप्यांचे विवाह पार पडले. मात्र, ही घटना काही दिवसांपूर्वीच सांगितली जात आहे.
बागेश्वर धामचे बाबा वादात: बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री आणि वाद हे आता समीकरणच झाले आहे. बागेश्वर धाम येथे महिलेचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली असतानाच दुसरीकडे शुक्रवारी एक तरुण बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. या दोन घटनांपासून बागेश्वर सरकार चर्चेत राहिले आहे. आता नागपूरच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीने महिलेच्या मृत्यूप्रकरणी पुन्हा एकदा त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी संघटनेने केली आहे.