भोपाळ (मध्य प्रदेश) : संत तुकाराम महाराज आणि त्यांच्या पत्नीवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर बागेश्वर धामच्या बाबांनी 'यू-टर्न' घेतला आहे. पंडित धीरेंद्र शास्त्री यांनी आता बॅकफूटवर येत माफी मागितली आहे. बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र शास्त्री म्हणाले की, माझ्या बोलण्याने ज्यांच्या भावना दुखावल्या आहेत, त्यांची मी हात जोडून माफी मागतो आणि माझे शब्द परत घेतो. काही दिवसांपूर्वीच पंडित धीरेंद्र शास्त्री यांनी संत तुकारामांवर भाष्य करताना त्यांची पत्नी त्यांना काठीने मारायची, असे म्हटले होते.
काय म्हणाले होते धीरेंद्र शास्त्री: सोशल मीडियावर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत होता, ज्यामध्ये बागेश्वर धाम महाराज संत तुकारामांबद्दल बोलताना दिसले होते की, 'त्यांची (संत तुकारामांची) पत्नी त्यांना रोज मारत होती.' पंडित धीरेंद्र शास्त्री यांच्या या वक्तव्यावरून विविध राजकीय पक्षांकडून सातत्याने निषेध करण्यात येत होता. सध्या बागेश्वर धाम सरकारने याबाबत माफी मागितली आहे.
यात देवाची कृपा काय: एका कार्यक्रमात ते म्हणाले होते की, संत तुकाराम महाराष्ट्रातील एक महात्मा होते. त्यांची पत्नी त्यांना रोज काठीने मारायची. कुणी तरी त्यांना विचारले, तुम्ही रोज बायकोचा मार खाता. तुम्हाला लाज नाही वाटत का? त्यावर तुकाराम महाराज म्हणाले, मला मारहाण करणारी बायको मिळाली ही देवाचीच कृपा आहे. त्यावर ती व्यक्ती म्हणाली, यात देवाची कृपा काय? तेव्हा तुकाराम महाराज म्हणाले, अरे, प्रेम करणारी पत्नी मिळाली असती तर मी देवाच्या प्रेमात पडलो नसतो. भक्तीत लीन झालो नसतो. पत्नीच्या प्रेमात पडलो असतो. मारहाण करणारी पत्नी मिळाल्याने देव मला त्याची सेवा करण्याची संधी तर देतो. प्रभू रामाच्या चरणी लीन होण्याची संधी तर देतोय, असे ते म्हणाले होते.
अखेर मागितली माफी: संत तुकारामांच्या पत्नीबाबत केलेल्या वक्तव्यावर बॅकफूटवर येत बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र शास्त्री म्हणाले, संत तुकाराम हे महान संत होते आणि ते आमचे आदर्शही आहेत. एका कथेमध्ये आम्ही वाचले होते की, त्यांच्या पत्नी विचित्र स्वभावाच्या होत्या. आम्ही एक उसाची कथा वाचली होती, ज्यात लिहिलं होतं की 'त्याची (संत तुकाराम) बायको त्यांना ऊस आणायला सांगते आणि नंतर त्याच उसने त्यांना मारते. त्यामुळे उसाचे दोन तुकडे होतात. मला तसे बोलायचे नव्हते पण तरीही आमच्या बोलण्याने ज्यांच्या भावना दुखावल्या आहेत त्यांची आम्ही हात जोडून माफी मागतो आणि आमचे शब्द परत घेतो.