मुंबई - डॉ. भीमराव आंबेडकर यांचा प्रवास संघर्षाने भरलेला राहीला. परंतु, या पावलोपावली वाट्याला आलेल्या संघर्षावर मात करत शिक्षणाचे दार ठोठावत हा संघर्षाचा प्रवास महामानव होण्यात स्थिरावला. (Ambedkar Birt Anniversary Is Being Celebrated) भारताच्या स्वातंत्र्यानंतर देशाच्या संविधानाच्या निर्मितीमध्ये बाबासाहेबांचा मोलाचा वाटा आहे. बाबासाहेब जातिव्यवस्थेविरुद्ध आवाज उठवणारे एक समाजसुधारकही होते. आज गुरूवार (दि. 14 एप्रिल)रोजी त्यांची जयंती सर्वत्र आनंदाने साजरी होत आहे.
जयंतीचा इतिहास - 14 एप्रिल 1928 रोजी जनार्दन सदाशिव रणपिसे यांनी पुण्यात प्रथमच डॉ. भीमराव आंबेडकर यांची जयंती साजरी केली. जनार्दन सदाशिव रणपिसे हे आंबेडकरांच्या अत्यंत निष्ठावान अनुयायांपैकी एक होते. तेव्हापासून दरवर्षी 14 एप्रिलला आंबेडकर जयंती साजरी करण्याची परंपरा सुरू झाली. भारतात, 14 एप्रिल ही दरवर्षी अधिकृत सार्वजनिक सुट्टी असते.
जयंतीचे महत्त्व - डॉ. बाबासाहेब दलित समाजाच्या समान हक्कासाठी लढले. याशिवाय भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार करून जात, धर्म, संस्कृती, पंथ इत्यादी बाजूला सारत सर्व नागरिकांना समान अधिकार दिले. आंबेडकर राज्यसभेतून दोनदा खासदार म्हणून निवडून आले. पुढे, डॉ. भीमराव आंबेडकर यांचे (6 डिसेंबर 1956)रोजी निधन झाले. (1990)मध्ये मरनोत्तर बाबासाहेबांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
चैत्यभूमीवर उत्साहात जयंती - बाबासाहेबांची जयंती यंदा राज्यभरात उत्साहात साजरी करण्यात येत आहे. कोरोनामुळे गेली दोन वर्षे जयंती साधेपणाने साजरी करण्यात येत होती. मात्र, यंदा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहाने पण आरोग्याची काळजी घेऊन साजरी करू असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. कोरोनाचे सावट कमी झाले आहे. मात्र, आरोग्याच्या नियमांचे पालन करून हा जयंती उत्सव आपण उत्साहाने साजरा करूयात, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहयाद्री अतिथीगृह येथे मंगळवारी आयोजित बैठकीत सांगितले होते.
चैत्यभूमी येथे हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी - भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्त्वज्ञ, समाजसुधारक असलेल्या बाबासाहेबांचे कार्य खूप मोठे आहे. त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य (दलित) लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली. आज मुंबई महापालिका आणि राज्य शासनाच्या वतीने सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. महापरिनिर्वाण दिनाप्रमाणे जयंती दिनी राज्य शासनाच्या वतीने चैत्याभूमी येथे हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टीच्या मागणी यावेळी मान्य करण्यात आली आहे.
हेही वाचा - 'नाजा, तुझ्या हातची बोंबलाची चटणी भारी गं', बाबासाहेबांचे शब्द आजही कानात घुमतात