नवी दिल्ली Ayushman Bhava : १७ सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस आहे. यादिवशी केंद्र सरकारनं एक नवीन कार्यक्रम सुरू करण्याचं ठरवलंय. राज्याद्वारे चालवल्या जाणाऱ्या आरोग्य योजना इच्छुक लाभार्थ्यापर्यंत पोहचाव्यात, हा यामागचा उद्देश आहे. 'आयुष्मान भव' असं या कार्यक्रमांच नाव ठेवण्यात आलंय. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ही माहिती दिली.
६०,००० लोकांना आयुष्मान भारत कार्ड दिलं जाईल : 'या कार्यक्रमादरम्यान अनेक आरोग्य शिबिरांचं आयोजन केलं जाईल. तसेच ६०,००० लोकांना आयुष्मान भारत कार्ड दिलं जाईल', असं मनसुख मांडविया यांनी सांगितलं. आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (AB-PMJAY) ही जगातील सर्वात मोठी आरोग्य संरक्षण योजना आहे. ही योजना प्रति लाभार्थी कुटुंबाला प्रति वर्ष ५ लाख रुपये आरोग्य कव्हरेज प्रदान करते.
२०२५ च्या अखेरपर्यंत टीबी नष्ट करण्याचं लक्ष : 'गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त क्षयरोगाच्या (टीबी) मुद्द्यावर भर दिला गेला होता. पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, क्षयरोग नष्ट करण्याचं जगाचे लक्ष्य २०३० पर्यंत आहे, परंतु भारताला २०२५ च्या अखेर पर्यंतच टीबी नष्ट करायचा आहे', असं मनसुख मांडविया यांनी नमूद केलं. 'दर महिन्याला पोषक किट दिल्या जात असून त्याद्वारे रुग्णांना सर्वतोपरी मदत केली जात आहे. आम्हाला विश्वास आहे की लोकसहभागाच्या मदतीने देशातून क्षयरोगाचे उच्चाटन होईल', असं ते म्हणाले.
क्षयरोगाच्या रुग्णाला एका वर्षासाठी दत्तक घेण्याची योजना : यापूर्वी २०२२ मध्ये भारतीय जनता पार्टीनं देशाला क्षयरोग (टीबी) मुक्त करण्यासाठी एका वर्षाचा कार्यक्रम सुरू केला होता. या कार्यक्रमा अंतर्गत प्रत्येक कार्यकर्ता टीबी रुग्णाला दत्तक घेऊन वर्षभर त्याची काळजी घेण्याचं ठरवण्यात आलं. २०२५ पर्यंत पंतप्रधान मोदींचं क्षयरोगमुक्त भारताचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी क्षयरोगी रुग्णाला एका वर्षासाठी दत्तक घेण्याची ही योजना आहे.
हेही वाचा :