नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज 8 मार्चपासून भारताच्या चार दिवसीय दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याचा उद्देश व्यापार, गुंतवणूक आणि महत्त्वपूर्ण खनिजांसह अनेक क्षेत्रांमध्ये एकूण द्विपक्षीय संबंधांना चालना देणे हा आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात पंतप्रधान झाल्यानंतर अल्बानीज यांचा हा पहिलाच भारत दौरा असेल. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने (MEA) शनिवारी सांगितले की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज 8 ते 11 मार्च या कालावधीत भारताला भेट देणार आहेत.'
१० मार्चला राष्ट्रपती भवनात स्वागत : अल्बानीज यांच्यासमवेत व्यापार व पर्यटन मंत्री डॉन फॅरेल आणि संसाधने व उत्तर ऑस्ट्रेलियाचे मंत्री मॅडेलीन किंग तसेच उच्चस्तरीय व्यावसायिक शिष्टमंडळ असतील. परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की अल्बानीज होळीच्या दिवशी म्हणजे 8 मार्चला अहमदाबादला पोहोचतील. यानंतर ते ९ मार्चला मुंबईला जातील आणि त्याच दिवशी दिल्लीला येणार आहेत. त्यांचे १० मार्च रोजी राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात औपचारिक स्वागत केले जाईल.
मोदी आणि अल्बानीज शिखर परिषद : यानंतर मोदी आणि अल्बानीज यांच्यात वार्षिक शिखर परिषद होईल, ज्यामध्ये भारत - ऑस्ट्रेलिया व्यापक धोरणात्मक भागीदारी अंतर्गत सहकार्याच्या क्षेत्रांवर चर्चा केली जाईल. यासोबतच परस्पर हितसंबंधित प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही दोघेही चर्चा करतील. गेल्या काही वर्षांत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील संबंध अधिक घट्ट झाले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, 'पंतप्रधान अल्बानीज यांच्या भेटीमुळे सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीला आणखी गती मिळण्याची अपेक्षा आहे.'
द्रौपदी मुर्मूंचीही भेट घेणार : आपल्या दौऱ्यात अल्बानीज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही भेट घेणार आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये समान मूल्ये आणि लोकशाही तत्त्वांवर आधारित घट्ट आणि मैत्रीपूर्ण संबंध आहेत. दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारी वारंवार उच्चस्तरीय देवाणघेवाण आणि विविध क्षेत्रांमधील सहकार्य वाढवण्याद्वारे मजबूत आणि सखोल झाली आहे. भारत - ऑस्ट्रेलिया आर्थिक सहकार्य आणि व्यापार करार (ECTA) 29 डिसेंबर 2022 रोजी लागू झाला होता.
हेही वाचा : Antony Blinken In Auto : अँटोनी ब्लिंकनने केली ऑटोची सवारी! म्हणाले, अजून काही दिवस भारतात राहायचे आहे