नवी दिल्ली : राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांचा सदनाच्या सदस्यत्वाचा कार्यकाळ संपुष्टात येत असल्याने मंगळवारी सदनाकडून त्यांना निरोप देण्यात आला. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आझादांवर स्तुतीसुमने उधळली. तर दुसरीकडे, खासदार रामदास आठवले यांनी मात्र आपल्या विशिष्ट शैलीमध्ये आझादांना निरोप दिला.
आठवले म्हणाले, तुम्ही पुन्हा सदनात या..
यावेळी बोलताना रामदास आठवले म्हणाले, की तुमचा स्वभाव खूप चांगला आहे. तुम्ही पुन्हा या सदनात यायला हवे. जर काँग्रेस पक्ष तुम्हाला या सदनात पुन्हा आणत नसेल, तर आम्ही (भाजपा) आणू. आमच्याकडे येण्यास तुम्हाला कोणतीही अडचण होणार नाही. मीदेखील आधी तिकडे होतो, आता इकडे आलोय. मी आलोय तर मग तुम्हाला काय अडचण आहे? असे ते मिश्कीलपणे म्हणाले. तसेच रिपब्लिकन पार्टी या आपल्या पक्षाकडून त्यांनी आझादांना सदिच्छाही दिल्या.
यावेळी आठवलेंनी गुलाम नबी आझादांसाठी एक कविताही सादर केली :
राज्य सभा छोड़ कर जा रहे गुलाम नबी
हम मिलते रहेंगे आपको कभी-कभी
आपका नाम है गुलाम, इसलिए मैं करता हूं आपको सलाम
आपका नाम है गुलाम लेकिन आप हमेशा रहे आजाद
आप हम सभी को रहेंगे याद
15 अगस्त को भारत हुआ आजाद
लेकिन राज्य सभा से आप आज हो रहे आजाद
आप हमेशा रहो आजाद
हम रहेंगे आपके साथ
ये अंदर की है बात
मोदी जी जम्मू कश्मीर का मजबूत करेंगे हाथ
आपका देते रहेंगे साथ
मोदी, आझादही झाले भावूक..
त्यापूर्वी आझाद यांना निरोप देताना पंतप्रधान मोदीही भावूक झाल्याचे पहायला मिळाले. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही नबी यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. तर, आपल्या अखेरच्या भाषणावेळी गुलाम नबी आझादांनाही भावना अनावर झाल्या. या भाषणामध्ये त्यांनी आपल्या ४१ वर्षांच्या संसदीय कार्यकाळाचा उल्लेख केला. तसेच, भारतीय मुस्लीम असण्याबाबत त्यांना अभिमान असल्याचेही ते म्हणाले.
हेही वाचा : पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यानंतर भावूक झाले होते गुलाम नबी आझाद, मागितली माफी; पाहा व्हिडिओ...