नवी दिल्ली Akash Missile : भारतीय हवाई दलानं रविवारी (१७ डिसेंबर) आपल्या 'आकाश हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणाली'ची यशस्वी चाचणी घेतली. या क्षेपणास्त्रानं एकाच वेळी चार लक्ष्यं भेदली आहेत. यासह असं करणारा भारत हा जगातील पहिला देश बनला. संरक्षण अधिकाऱ्यानं ही माहिती दिली आहे.
एकाच वेळी चार मानवरहित लक्ष्यं नष्ट : नुकत्याच झालेल्या अस्त्रशक्ती २०२३ सराव दरम्यान, एकाच फायरिंग युनिटनं एकाच वेळी चार मानवरहित लक्ष्यं नष्ट केली. भारतीय हवाई दलानं १२ डिसेंबर रोजी सूर्य लंका एअर फोर्स स्टेशनवर हे प्रात्यक्षिक आयोजित केलं होतं. चाचण्यांबाबत स्पष्टीकरण देताना अधिकाऱ्यांनं सांगितलं की, भारतानं स्वदेशी आकाश क्षेपणास्त्र प्रणालीची मारक क्षमता दाखवली, जिथे एकाच वेळी चार मानव रहित हवाई लक्ष्य भेदण्यात आली.
सरफेस टू एअर हवाई संरक्षण प्रणाली : स्वदेशी आकाश शस्त्र प्रणालीची रचना डीआरडीओनं केली आहे. ही स्वदेशी वेपन सिस्टीम खरेदी करण्यासाठी अनेक आंतरराष्ट्रीय ग्राहकांनी ऑर्डर दिली आहे. ही यंत्रणा डीआरडीओच्या शास्त्रज्ञांद्वारे सातत्यानं अपग्रेड केली जाते. 'आकाश वेपन सिस्टीम' (AWS) ही लहान श्रेणीची 'सरफेस टू एअर हवाई संरक्षण प्रणाली' आहे. ही सिस्टिम शत्रूच्या हवाई हल्ल्यापासून मोठ्या क्षेत्राचं संरक्षण करण्यास सक्षम आहे.
एकाच वेळी अनेक लक्ष्यांना भेदू शकते : 'आकाश' ऑटोनॉमस किंवा ग्रुप मोडमध्ये एकाच वेळी अनेक लक्ष्यांना भेदू शकते. ही संपूर्ण शस्त्र यंत्रणा मोबाईल प्लॅटफॉर्मवर तैनात आहे. ही प्रणाली लक्ष्य शोधण्यापासून ते मारण्यापर्यंतची प्रक्रिया अतिशय वेगानं पार पाडते. विशेष म्हणजे ही संपूर्ण यंत्रणा स्वयंचलित आहे. तसेच ती रेल्वे किंवा रस्त्यानं वाहूनही नेली जाऊ शकते.
हे वाचलंत का :