गुवाहाटी : भारत-बांगलादेश सीमेवर आसाम पोलिसांनी एक गुप्त बोगदा शोधून काढला आहे. करीमगंज जिल्हा पोलिसांनी एका अपहरण प्रकरणाचा तपास करताना हा बोगदा शोधला आहे. तस्कर आणि गुन्हेगारांकडून हा बोगदा वापरण्यात येत असावा, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
सीमेपलीकडून घुसखोरी करण्यासाठी तस्कर, स्थलांतरीत आणि गुन्हेगार या बोगद्याद्वारे भारतात येत असावेत असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. एका अपहरणाच्या गुन्ह्याचा तपास करताना छुप्या बोगदा सापडल्याचे करिमगंज जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मयांक कुमार यांनी सांगितले.
काय आहे अपहरणाचा गुन्हा?
एका व्यक्तीला अपहरण करून सीमेपलीकडे बांगलादेशात नेण्यात आले असून असा गुन्हा जिल्ह्यातील निलमबाजार पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. अपहृत व्यक्तीचा शोध जिल्हा पोलीस घेत होते. त्यावेळी हा छुपा बोगदा पोलिसांना दिसला. मात्र, हा बोगदा अपहरण करण्यासाठी वापरण्यात आला किंवा नाही, यावर पोलिसांनी बोलण्यास नकार दिला. तपासानंतरच सर्वकाही स्पष्ट होईल, असे पोलिसांनी म्हटले आहे.
आसाम राज्याला २६४ किमीची सीमा -
बांगलादेशसोबत आसाम राज्याची २६४ किलोमीटरची आंतरराष्ट्रीय सीमा आहे. यातील ९२ किमी सीमा करिमगंज जिल्ह्यातून जाते. बांगलादेशसोबतचा काही सीमा भाग अद्यापही खुला आहे. त्यामुळे गुन्हेगार याचा फायदा घेत भारतात प्रवेश करून गुन्हा करतात. बांगलादेशातून अनेकजण भारतात अवैधरित्या स्थलांतरही करतात.