नवी दिल्ली : चीनने नदीत जास्तीचे पाणी सोडल्यानंतर ईशान्येकडील राज्यात महापूर येतो. त्यामुळे केंद्राने ब्रह्मपुत्रेच्या पाण्याचा प्रश्न चीनकडे उचलण्याचे आवाहन आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी केले आहे. चीन ब्रह्मपुत्रेत जास्तीचे पाणी सोडत असल्याने दरवर्षी अरुणाचल प्रदेश आणि आसामच्या वरिल प्रदेशात पूरस्थिती निर्माण होते.
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाशी चर्चा : ब्रह्मपुत्रेत चीनने जास्तीचे पाणी सोडल्याचा मुद्दा मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी केंद्रीय मंत्रालयांसमोर मांडला. त्यांनी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाशी (NDMA) देखील या विषयावर चर्चा केल्याची माहिती आसामचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री जोगेन मोहन यांनी सांगितले. आसाममध्ये दरवर्षी बारमाही पुराच्या समस्येचा सामना करावा लागत असल्याची माहिती ईटीव्ही भारतशी बोलताना जोगेन मोहन यांनी दिली. चीन जेव्हा ब्रह्मपुत्रेत जास्तीचे पाणी सोडते तेव्हा परिस्थिती आणखी बिकट होते. नदीच्या वरच्या भागात मुसळधार पाऊस पडत असल्याने चीन ब्रह्मपुत्रा नदीमध्ये (तिबेटमध्ये यारलुंग त्सांगपो म्हणून ओळखले जाते) जास्त पाणी सोडत असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
आसाममधील अनेक जिल्ह्यांमध्ये कहर : ब्रह्मपुत्रेत अशा जादा पाणी सोडल्यामुळे अरुणाचल प्रदेश आणि अप्पर आसाममधील अनेक जिल्ह्यांमध्ये पुरामुळे कहर होतो, असेही जोगेन मोहन म्हणाले. केंद्र सरकारने ब्रह्मपुत्रेचा पाणीप्रश्न बीजिंगकडे वेळोवेळी उपस्थित केला आहे. आसाममध्ये येऊ घातलेल्या पूर परिस्थितीनंतर, राज्य सरकारने या वर्षी राज्यातील कार्बी आंगलाँग आणि दिमा हासाओ जिल्हे पूरप्रवण म्हणून जाहीर केले आहेत. दिमा हासाओ आणि कार्बी आंगलाँग हे दोन जिल्हे या वर्षीच्या पुरात गंभीरपणे बाधित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आम्ही उपायुक्तांना पूर परिस्थिती कमी करण्यासाठी सर्व खबरदारी घेण्यास सांगितल्याचेही जोगेन मोहन यांनी स्पष्ट केले.
आसाममध्ये 88 लाखांहून अधिक नागरिक बाधित : राज्यातील सर्व उपायुक्तांना आगामी पुरानंतर उद्भवू शकणारी परिस्थिती कमी करण्यासाठी सर्व खबरदारीसह सज्ज राहण्यास सांगितले आहे. अलीकडेच मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी गुवाहाटी येथे झालेल्या बैठकीदरम्यान पूरग्रस्त सर्व संवेदनशील क्षेत्रे ओळखण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्हा अधिकाऱ्यांना मदत केंद्रे विशेषत: शाळा आणि इतर ठिकाणांची यादी करण्यास सांगितले आहे. जेथे पुराच्या वेळी बाधित लोकांना हलविले जाऊ शकते, असेही जोगेन मोहन यांनी स्पष्ट केले आहे. गेल्या वर्षी पुरामुळे आसाममध्ये 88 लाखांहून अधिक लोक बाधित झाले होते. तर 181 जणांचा मृत्यूही झाला होता. गेल्या वर्षीच्या पुराचा राज्यातील 35 जिल्ह्यांनाही फटका बसला होता, असेही जोगेन मोहन यांनी यावेळी स्पष्ट केले.
हेही वाचा -