तेजपूर (आसाम) E Bike From Cycle : आसाममधील एका तरुणानं केवळ ८ रुपयांत ३० किमी पर्यंत चालण्याची क्षमता असलेली खास 'वंडर बाईक' विकसित केली आहे. तेजपूर महामार्गावर या विशेष बॅटरीवर चालणाऱ्या बाईकचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं. तेजपूरच्या बारिकासुबुरी परिसरातील विद्यार्थी मस्कुल खान यानं डिझाइन केलेल्या या बाईकला 'वंडर बाइक २५०' असं नाव देण्यात आलंय.
'वंडर बाईक' नाव का दिलं : मस्कुल खान म्हणाला की, "ही स्पेशल बाईक केवळ ८ रुपयांमध्ये ३० किमी अंतर सहज पार करू शकते". बाईकच्या अनोख्या नावाबद्दल विचारलं असता खान म्हणाला की, "या ई-बाईकचं मॉडेल तुम्हाला कुठेही सापडणार नाही. त्यामुळे याला 'वंडर बाईक' असं नाव देण्यात आलंय". मस्कुल खान यानं लॉकडाऊन दरम्यान घरी बसून एक ई-सायकल बनवली होती. आता त्यानं त्याची कल्पक बुद्धी वापरून या सायकलच्या मॉडेलमध्ये आणखी सुधारणी करत ही ई-बाईक बनवली.
बॅटरी चार्ज होण्यासाठी केवळ ५ तास लागतात : आपल्या नावीन्यपूर्ण कौशल्याबद्दल बोलताना खान यानं, भविष्यात ई-कार बनवण्याचं स्वप्न असल्याचं सांगितलं. मस्कुल खान यांनं त्याच्या नवकल्पनांचं श्रेय वडिलांना दिलं असून, त्यांनी माझी स्वप्नं पूर्ण करण्यासाठी मदतीचा हात पुढे केला असल्याचं तो म्हणाला. या ई-बाईकचं वजन केवळ ३० किलो असून, तिच्यात ८०-१०० किलो वजन वाहून नेण्याची क्षमता आहे. "ही बाईक बॅटरीनं चालते. बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी फक्त ५ तास लागतात", असं मस्कुल खान यांनं सांगितलं.
या विद्यार्थ्यानं त्याच्या कल्पक बुद्धीनं डिझाइन केलेल्या बाइकनं तेजपूरमध्ये विशेष लक्ष वेधलं आहे. यासह त्याची मोठ्या प्रमाणावर प्रशंसा देखील होते आहे. आता ही बाईक व्यावसायिक स्तरावर बाजारात आणली जाते का, हे पाहणं बाकी आहे.
हे वाचलंत का :