दिसपुर - केंद्रीय निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेत विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. आसाममध्ये विधानसभा निवडणूक तीन टप्प्यात पार पडणार आहे. राज्यात भाजपचे सरकार असून मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल हे मुख्यमंत्री आहेत. आसाम विधानसभेचा कार्यकाळ 31 मे 2021 रोजी संपणार आहे.
पहिला टप्प्यातील मतदान 27 मार्चला 47 विधानसभा मतदारसंघासाठी होईल. तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान हे 1 एप्रिल 2021 ला 39 विधानसभा मतदारसंघासाठी होणार आहे. तर याचबरोबर तिसऱ्या टप्प्यातील मतदान हे 6 एप्रिल 2021 ला 40 जागांसाठी मतदान पार पडेल. तर निवडणुकीचा निकाल 2 मे 2021 ला जाहीर होईल.
2016 विधानसभा निवडणूक -
ईशान्य भारतातील सात राज्यांना ’सात भगिनी’ असे म्हटलं जाते. यात आसाम हे सर्वांत मोठे राज्य आहेत. गेल्या निवडणुकीत भाजपने आसाममध्ये 60 जागा जिंकून सत्ता मिळवली होती. तर पिछेहाट झालेल्या काँग्रेसला फक्त 26 जागांवर समाधान मानावं लागलं होतं. आसाममधील काँग्रेसचे मोठे नेते म्हणजे तरुण गोगाई यांचे वर्चस्व आसाममध्ये होते. सलग तीन टर्म सत्तेत असणाऱ्या गोगोई यांची राजकीय कारकीर्द पन्नास वर्षांपेक्षा जास्त होती. आसाम विधानसभेच्या 2021 मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजपविरोधात विरोधी पक्षांची आघाडी तयार करण्याचा तरुण गोगोईंचा प्रयत्न होता. मात्र, नोव्हेंबरमध्ये त्यांचे निधन झाल्याने काँग्रेसचे मोठे नुकसान झाले. त्यांची जागा घेऊ शकेल, असा चेहरा सध्या काँग्रेसकडे नाही.
भाजपासमोर सत्ता राखण्याचे आव्हान -
काँग्रेस राज्यात कमी पडली असली तरी भाजपाला यावेळी सत्ता मिळवणे कठिण असल्याच चित्र आहे. आसाममध्ये धार्मिक बहुलता आहे. एनआरसी आणि सीएए कायद्यांमुळे भाजपाच्या पुढे एक आव्हान निर्माण झाले आहे. या कायद्यांविरोधात आसाममध्ये मोठे आंदोलन झाले होते. मात्र, सत्ता कायम राखण्यासाठी भाजपचे प्रयत्न, प्रचारही जोरात सुरु आहे. येत्या निवडणूकामध्ये भाजपकडून माजी न्यायमूर्ती रंजन गोगोई यांचे नावावर शिक्कमोर्तब होण्याची शक्यता आहे.