नवी दिल्ली Arvind Kejriwal ED : दिल्लीच्या कथित दारू घोटाळ्याप्रकरणी ईडीनं १८ डिसेंबरला मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना समन्स पाठवून चौकशीसाठी बोलावलं होतं. या समन्सला आता केजरीवाल यांनी उत्तर दिलं आहे. केजरीवाल यांनी समन्स बेकायदेशीर आणि राजकीय हेतूनं प्रेरित असल्याचं म्हटलंय. तसंच आपण प्रत्येक कायदेशीर समन्स स्वीकारण्यास तयार असल्याचं त्यांनी आपल्या उत्तरात म्हटलंय.
समन्स बेकायदेशीर आणि राजकीय हेतूनं प्रेरित : अरविंद केजरीवाल यांनी मागील समन्सप्रमाणेच ईडीचं हे समन्सही बेकायदेशीर आणि राजकीय हेतूनं प्रेरित असल्याचं म्हटलंय. ईडीला पाठवलेल्या उत्तरात केजरीवाल यांच्या कायदेशीर पथकानं, त्यांना पाठवण्यात आलेले समन्स मागे घेण्यात यावे, असं सांगितलं. "केजरीवाल यांनी आपलं जीवन प्रामाणिकपणे आणि पारदर्शकतेनं जगलं आहे. त्यांच्याकडे लपवण्यासारखं काहीही नाही", असं या उत्तरात म्हटलंय.
१० दिवसांसाठी विपश्यनेसाठी रवाना : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ईडीनं दारू घोटाळ्याप्रकरणी पाठवलेल्या दुसऱ्या समन्सनंतरही चौकशीसाठी हजर झाले नाहीत. ते पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार बुधवारी १० दिवसांसाठी विपश्यनेसाठी गेले. दिल्ली सरकारच्या कथित दारू घोटाळ्याप्रकरणी सोमवारी ईडीनं अरविंद केजरीवाल यांना पुन्हा समन्स पाठवून २१ डिसेंबरला चौकशीसाठी बोलावलं होतं.
एप्रिल महिन्यात चौकशी केली होती : या प्रकरणी सीबीआयनं अरविंद केजरीवाल यांची यावर्षी एप्रिल महिन्यात चौकशी केली होती. यानंतर ईडीनं नोटीस बजावून केजरीवाल यांना २ नोव्हेंबरला पहिल्यांदा चौकशीसाठी बोलावलं. आतापर्यंत अरविंद केजरीवाल हिमाचल प्रदेश, बेंगळुरू आणि महाराष्ट्रातील एका ठिकाणी विपश्यना ध्यानासाठी जात होते. मात्र यावेळी ते पंजाबमधील होशियारपूर येथे गेले आहेत. विपश्यना ध्यानाच्या नियमांनुसार केजरीवाल पुढील १० दिवस कोणाच्याही संपर्कात राहणार नाहीत. त्यांच्या अनुपस्थितीत मंत्री अतिशी ह्या सरकारचं काम पाहतील.
हे वाचलंत का :