म्हैसूर: स्वतःच मृत मोठा भाऊ असल्याचे भासवत तोतयागिरी करत २४ वर्षे शिक्षक म्हणून काम करणाऱ्या एकाला आता अटक करण्यात आली आहे. लोकेश गौडा यांचे धाकटे भाऊ लक्ष्मण गौडा यांनी 24 वर्षे हुनसूर तालुक्यातील कट्टेमालावाडी गावासह विविध ठिकाणच्या शासकीय उच्च प्राथमिक शाळांमध्ये मोठा भाऊ लोकेश गौडा म्हणून काम केले. हे प्रकरण आता उघडकीस आले असून, लक्ष्मण गौडा यांची न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. 2019 मध्ये, इंटेक राजू या सामाजिक कार्यकर्त्याला याची माहिती मिळाल्यावर त्यांना संशय आला. त्यांनी सार्वजनिक शिक्षण विभागाच्या उपसंचालकांकडे तक्रार केली होती. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले आहे. लक्ष्मणे गौडा यांचे कुटुंब मूळ हेब्बालू गावात राहत होते. 1994-95 मध्ये लक्ष्मणे गौडा यांचे मोठे बंधू लोकेश गौडा यांची सरकारी शिक्षक पदावर निवड झाली. मात्र कामावर रुजू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
लक्ष्मण गौडा यांनी पेरियापट्टणम येथील मुदनाहल्ली गावातील शाळेत लोकेशच्या नावाचे नियुक्तीपत्र देऊन शिक्षकाची नौकरी सुरू केली. त्यानंतरच्या २४ वर्षांत त्यांनी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी शिक्षक म्हणून काम केले. मात्र त्यांची लोकायुक्तांकडे तक्रार झाल्यानंतर तहसीलदारांनी याबाबत अहवाल मागवला. लक्ष्मण गौडा यांच्या कुटुंबाने तहसीलदारांना माहिती देण्यास नकार दिला. या पार्श्वभूमीवर त्यांच्याविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची सूचना केली. अधिकाऱ्यांनी आरोपींना बोलावून चौकशी केली. त्यानंतर आरोपी कागदपत्रे सादर करण्यात अयशस्वी ठरला. 21 मार्च रोजी पिरियापट्टणम पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली होती. त्याला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे, असे ब्लॉक शिक्षण अधिकारी एसपी नागराज यांनी सांगितले.
हेही वाचा : ऐकावे ते नवलचं! दोन मैत्रिणांनीना करायचे आहे एकाच तरुणाशी लग्न, अशी आहे अट