हैदराबाद: हैदराबादच्या बेगमपेठ (begumpet) जिल्ह्यातील रहिवासी असलेला सय्यद महबूब अली (syed mahaboob ali) याचे नेहमीच क्रीडा क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न होते. त्याचे वडील आंतरराष्ट्रीय रेसर, भाऊ व्हॉलीबॉल खेळाडू, मोठी बहीण राष्ट्रीय बॉक्सर आणि त्यांची धाकटी बहीण राष्ट्रीय कबड्डी खेळाडू होती. एकप्रकारे सय्यद हा खेळाडूंच्या कुटुंबातच लहानाचा मोठा झाला.
क्रीडा कारकीर्दीच्या सुरुवातीलाच दुखापत: 2004 मध्ये भारतीय ज्युनियर पुरुष हॉकी संघाच्या शिबिरात सहभागी होताच त्याच्या क्रीडा कारकीर्दीची सुरुवात झाली. पण प्रशिक्षण सत्रादरम्यान सय्यदला दुखापत झाली आणि त्याच्या ACL लिगामेंटचे 75 टक्के नुकसान झाले. या दुखापतीमुळे त्याच्या हॉकी कारकीर्दीचा अंत झाला. त्याला सहा महिने बेड रेस्ट आणि लिगामेंट प्रत्यारोपण करण्याचा सल्ला देण्यात आला होता. दुखापती बाबत बोलताना सय्यद म्हणतो, "त्यावेळी मी खरोखरच उदास झालो होतो. माझ्या वडिलांनी मला कधीही हार न मानण्याचा सल्ला दिला होता. मी अस्थिबंधनांवर संशोधन करण्यास सुरुवात केली आणि ACL दुखापतींबद्दल शक्य तितके शिकायचा प्रयत्न केला. मी स्वतःला बॉडी बिल्डिंगमध्ये समर्पित करण्याचा निर्णय घेतला आणि माझे लक्ष त्याकडे वळवण्यास सुरुवात केली.
सर्वात तरुण मिस्टर इंडिया: सय्यदच्या शरीरसौष्ठवातील मेहनत कामी आली आणि 2004 मध्ये वयाच्या १७ व्या वर्षी तो भारतातील सर्वात तरुण मिस्टर इंडिया बनला. त्यानंतरही त्याने रिंगणात सतत प्रगती केली आणि तो एकूण आठ वेळा मिस्टर इंडिया बनला. तो म्हणतो, "मला जीवनात एक नवीन दिशा मिळाली आणि शरीर सौष्ठव साठी मी पूर्णपणे समर्पित झालो. यामुळे मला माझ्या आयुष्यात पुन्हा लक्ष केंद्रित करण्यास आणि माझी खेळाची आवड जोपासण्यात मदत झाली".
आर्म रेसलिंगच्या खेळात एंट्री: 2012 नंतर सय्यद बॉडीबिल्डिंगपासून दूर गेला आणि त्याने आरोग्य व फिटनेस क्षेत्रात व्यवसाय चालवण्याचा निर्णय घेतला. काही वर्षांनंतर भारतीय आर्म-रेसलिंग फेडरेशनचे अध्यक्ष हाशिम रेझा झाबेथ यांच्याशी झालेल्या भेटीमुळे त्याला त्याच्या कारकिर्दीत आणखी एक मार्ग मिळाला. सय्यद म्हणतो, झाबेथ यांच्याशी झालेल्या मीटिंगनंतर मला माझ्या बालपणीच्य आठवण झाली जेव्हा मी माझ्या वडिलांसोबत आर्म रेसलिंग मॅचेसमध्ये भाग घ्यायचो. ते नेहमीच मला पराभूत करायचे, पण नंतर मी त्यांच्याविरुद्धही जिंकू लागलो. हाशिमच्या सल्ल्यानुसार, सय्यदने 2017-18 मध्ये भारतीय आर्म रेसलिंग कोच मुस्तफा अली यांच्याशी संपर्क साधण्याचा निर्णय घेतला आणि त्याचा या खेळासोबतचा प्रवास सुरू झाला. "तेव्हापासून व्यावसायिक आर्म-कुस्तीमधील माझा प्रवास सुरू झाला. मी या खेळासाठी स्वत:ला समर्पित केले आणि पाच वर्षांच्या अल्प कालावधीत मी 2022 मध्ये राष्ट्रीय सुवर्णपदक जिंकले, तो म्हणाला.
प्रो पंजा लीग: त्यानंतर सय्यदने स्वतःला प्रो पंजा लीगशी जोडण्याचा निर्णय घेतला. त्याने जुलै 2022 मध्ये ग्वाल्हेरमध्ये झालेल्या रँकिंग स्पर्धेत भाग घेतला. प्रो पंजा लीग रँकिंग टूर्नामेंट 2022 मध्ये त्याने पाचवी फेरी गाठली. अंतिम फेरी गाठल्याने त्याच्या सामर्थ्याकडे सर्वांचे लक्ष वेधल्या गेले. "प्रो पंजा रँकिंग टूर्नामेंट ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय स्तरावरील आहे. प्रो पंजा लीग सध्या ज्या स्तरावर चालत आहे त्या स्तरावर चालत राहिल्यास, देशातील आर्म रेसलरचे जीवन आणि कारकीर्द घडवण्यास मदत होईल," असे सय्यद म्हणतात. "आयुष्यात निराशा असूनही मी या वयात एका खेळात स्पर्धा करू शकलो याचा मला आनंद आहे. आर्म-रेसलिंगने मला जीवनात आणखी एक उद्देश दिला आहे आणि मला पुढील अनेक वर्षे ही कारकीर्द सुरू ठेवण्याची इच्छा आहे" असे ते शेवटी म्हणाले.