इस्लामाबाद - पाकिस्तानमध्ये हिंदूंच्या मंदिरांना लक्ष्य करण्यात आल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. पुन्हा एकदा पाकिस्तानमधील खैबर पख्तुनवा प्रांतातल्या करक जिल्ह्यात जमावाने एका मंदिराची नासधूस केली आहे. जमावाने सुरवातीला मंदिर पेटवून दिले आणि त्यानंतर तोडफोड करत नासधूस केली. घटनेचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.
धार्मिक पक्षाच्या स्थानिक नेत्यांच्या नेतृत्वात हजारोच्या जमावाने मंदिराविरोधात आंदोलन केले. मंदिर हटवण्याची मागणी त्यांनी केली. यावेळी नेत्यांनी प्रक्षोभक भाषणं करत जमावाला मंदिर पाडण्यासाठी प्रवृत्त केले. संबधित मंदिर हे 1920 ला बांधलेले असावे, असा अंदाज आहे. संपूर्ण भागामध्ये एकाही हिंदू व्यक्तीचे घर नाही. याप्रकरणी एकाही अटक करण्यात आली नसून गुन्ह्याची नोंद झाली आहे. यापूर्वीही 1197 मध्ये मंदिराची नासधूस करण्यात आली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर 2015 मध्ये मंदिर बांधण्यात आले.
मंदिरावरील हल्ल्याचा निषेध -
पाकिस्तानचे मानवाधिकार मंत्री शिरीन मझारी यांनी मंदिरावरील हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे. सरकार आरोपींवर कारवाई करून न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. सर्व नागरिकांची आणि त्यांच्या पार्थनास्थळांची सुरक्षा सुनिश्चित करण्याची जबाबदारी सरकारची आहे, असे त्या म्हणाल्या.
हिंदू समाजातून संताप -
काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या सिंध प्रदेशात हिंदू मंदिराची तोडफोड झाली होती. पाकिस्तानात 828 पैकी फक्त 20 मंदिरेच बाकी असल्याचे लंडनस्थित पाकिस्तानी मानवाधिकार कार्यकर्त्या अनिला गुलजार यांनी म्हटलं होतं. अल्पसंख्याक सुरक्षित नसल्यावरून पाकिस्तान नेहमीच संयुक्त राष्ट्राच्या सभेत तोंडशी पडला आहे. आता मंदिराच्या तोडफोडीनंतर पाकिस्तानातील अल्पसंख्याकाच्या सुरक्षतेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. पाकिस्तानमध्ये हिंदूंचा सर्वात मोठा अल्पसंख्याक समुदाय आहे. परंतु, हिंदू मंदिरांबद्दल तोडफोड केल्याच्या वारंवार बातम्या येत आहेत. या हल्ल्याबद्दल हिंदू समाजातून संताप व्यक्त होत आहे. फक्त मंदिराची तोडफोड करण्यात येत नाही. तर हिंदू मुलींना धर्मांतर करण्यासाठी बळजबरी केल्याच्याही घटना समोर आल्या आहेत.
इस्लामाबादेत हिंदूंसाठी एकही मंदिर नाही -
पाकिस्तानकडून नेहमीच भारतावर काश्मीरमधील अल्पसंख्यांकाचा प्रश्नांवरून टीका करण्यात येते. मात्र, पंतप्रधान इम्रान खान हे स्वत:च्या देशातील अल्पसंख्यांचे रक्षण करण्यात अपयशी ठरले आहेत. स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानातील अनेक पुरातन हिंदू मंदिरांची तोडफोड करण्यात आली आहे. इस्लामाबाद शहरात तर हिंदूंसाठी एकही मंदिर नाही. त्यामुळे शहरात मंदिर बांधण्याची मागणी पाकिस्तानातील हिंदू संघटनांकडून होत होती.