पालघर : श्रावण महिन्यातील सोमवारला हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी महादेवाचे भक्त आवर्जून महादेवाच्या दर्शनासाठी येत असतात. पालघर तालुक्यातील माहीम येथे सुमारे 400 ते 500 वर्ष प्राचीन 'महेश्वरी मंदिर' आहे. या मंदिराची निर्मिती यजुर्वेदी ब्राह्मणांनी केली असल्याचा इतिहास आहे. या ठिकाणी श्रावणात मोठ्या प्रमाणात भक्तगण दर्शनासाठी येत असतात. बिंबिसार राजा या भागात आल्यावर त्याच्या बरोबरीने यजुर्वेदी ब्राह्मण सुद्धा आले होते. काही काळाने सर्व इथे स्थिर स्थावर झाल्यावर, यजुर्वेदी ब्राह्मणांनी या किनारपट्टी गावांमध्ये विशेषतः शिरगाव, माहीम, केळवा, वसई व मुंबई येथे सुद्धा शंकरांच्या मंदिराची निर्मिती केली. असा उल्लेख 'यजुर्वेदी ब्राह्मणांचा' इतिहास या पुस्तकात पहावयास मिळतो.
यजुर्वेदी ब्राह्मणांनी जेव्हा या भागातून स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतला, तेव्हा 'हे मंदिर आमचे आहे. आम्ही हे घेऊन जाणार', असे त्यांनी ठरविले. ठरविल्यावर गावकऱ्यांमध्ये व ब्राह्मणांमध्ये वादावादी झाली. एके दिवशी रात्री खोदण्याचे सर्व सामान घेऊन यजुर्वेदी ब्राह्मणांनी गुपचूप ते मंदिर खणण्याच्या कामास सुरुवात केली. याचा सुगावा गावकऱ्यांना लागल्यावर गावकरी जमले व त्यांनी यासाठी विरोध केला. त्यावेळी ब्राह्मणांनी शेवटी तिथून पळ काढला. याबाबत नंतर तक्रारीही झाल्या, त्याचा न्याय निवाडा वसई येथे करण्यात आला. त्यावेळी वसई येथे पेशव्यांचा मुक्काम होता. पेशव्यांच्या दरबारात यजुर्वेदी ब्राह्मणांची साक्ष नोंदवली. तेव्हा साक्षीमध्ये सांगण्यात आले की, शिरगाव, माहीम, केळवा, वसई व मुंबई येथे शंकराची मंदिर आहेत. ती स्वतः यजुर्वेदी ब्राह्मणांकडून बांधण्यात आली आहेत. हे पेशव्यांनी मान्य केले व वसईचेही मंदिर त्यांचेच असल्याचा निर्णय पेशव्यांकडून देण्यात आला.
इतके पुरातन मंदिर अनेक वर्षे दुर्लक्षित होते. मंदिरासमोर सुंदर तलाव असून; अत्यंत प्रसन्न असे वातावरण या परिसरात अनुभवास मिळते. मोडकळीस आलेल्या या मंदिराचा जिर्णोद्धार करण्याचा विचार नरेंद्र (बबन) पाटील व परिसरातील ज्येष्ठ व्यक्तींना आला. आणि त्यांनी पंचवीस वर्षापूर्वी या पुरातन मंदिराला वेगळे रूप देण्याचा प्रयत्न केला. मंदिराच्या परिसरात पाच चाळ (राहते ठिकाण) आहेत. त्यामुळे हा खर्च आपण करायचा, असा विचार पुढे आल्यावर माहेरवाशीन व माहीम मधील गावकऱ्यांना सुद्धा निधी साठी आवाहन करण्यात आले. आवाहन केल्यावर सर्व बाजूंनी मंदिरा साठी मदत उभी राहिली. या मंदिराला लागूनच एका सतपूरुषाची समाधी सुद्धा त्या ठिकाणी आहे. एकंदरीत मंदिराचे रुपडे पालटल्याने व परिसर स्वच्छ झाल्याने, भक्तांचा ओघ ही वाढू लागला. दरवर्षी महाशिवरात्रीची यात्रा सुद्धा इथे भरते. एकंदरीत महेश्वरी मंदिर म्हणजे भक्तांसाठी वेगळी अनुभूती ठरत आहे.
दरम्यान, ग्रामपंचायत माहिमच्या माध्यमातून सदर मंदिरपरिसरात असलेल्या तलावाचा गाळ काढून, खोली वाढवण्यात आली. तलावाच्या बाजूने परिक्रमा करण्यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य नमिता राऊत यांच्या प्रयत्नाने, जॉगिंग ट्रॅक करण्याचे काम सुरू आहे. तसेच तलावाला आत मधून तटबंधी करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामपंचायत सदस्य नितीश राऊत यांच्या प्रयत्नाने, तलावातील गाळ काढून तलावाची खोली वाढवण्यात आली आहे. त्यामुळे परिसरातील विहिरींची पाण्याची पातळी वाढून पाण्याची टंचाई कमी होण्यास मदत झाली आहे. ग्रामपंचायत माहीमच्या माध्यमातून बालोद्यान तयार करण्यात आले आहे.
हेही वाचा : Somvati Amavasya 2023: सोमवती अमावस्येला हरिद्वारमध्ये गंगा स्नानासाठी प्रचंड गर्दी