नवी दिल्ली Amit Khare gets extension : माजी आयएएस अधिकारी अमित खरे यांना पंतप्रधान मोदींचे सल्लागार म्हणून मुदतवाढ देण्यात आली आहे. मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या आदेशानुसार ही मुदतवाढ देण्यात आली आहे. खरे यांची ऑक्टोबर 2021 मध्ये दोन वर्षांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सल्लागार या पदावर नियुक्ती करण्यात आली होती. अमित खरे हे 1985 - बॅचचे (निवृत्त) झारखंड केडरचे भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी आहेत. ते 30 सप्टेंबर 2021 रोजी सेवानिवृत्त झाले होते. भारतीय प्रशासन सेवेत कार्यरत असताना त्यांनी सर्वात शेवटी उच्च शिक्षण सचिव म्हणून काम केले होते.
सल्लागार म्हणून नियुक्ती - यासंदर्भात उल्लेखनिय बाब म्हणजे मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने (ACC) खरे यांच्या कार्यकाळात 12 ऑक्टोबरच्या पुढे, भारत सरकारमधील सचिव दर्जाच्या अधिका-यांच्या बाबतीत लागू असलेल्या नेहमीच्या अटी व शर्तींवर कराराच्या आधारावर त्यांना मुदतवाढ देण्यास मान्यता दिली आहे. यापुढे पंतप्रधानांच्या बाकी राहिलेल्या संपूर्ण कालावधीसाठी त्यांचे सल्लागार म्हणून नियुक्ती देण्यात येत असल्याचं खरे यांना दिलेल्या नियुक्ती आदेशात म्हटलं आहे.
राजेश गोखले यांनाही मुदतवाढ - खरे यांच्याबरोबर दुसरे एक अधिकारी गोखले यांनाही त्यांच्या कार्यकाळात मुदतवाढ देण्यात आली आहे (Rajesh Gokhale extension). या दुसर्या आदेशानुसार, ACC ने राजेश गोखले यांनाही मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यांना बायोटेक्नॉलॉजी विभागाचे सचिव म्हणून दोन वर्षांच्या कालावधीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यांना 1 नोव्हेंबर 2023 पासून कार्यकाळ वाढवण्यास मान्यता दिली आहे, असे वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.
यापूर्वी म्हणजेच 2021 मध्ये नियमित सेवेतून निवृत्तीनंतर अमित खरे यांची पंतप्रधान मोदींचे सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यावेळी, मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने (एसीसी) खरे यांची पंतप्रधान कार्यालयात (पीएमओ, भारत सरकारच्या सचिवपदाच्या श्रेणी आणि दर्जात) सल्लागार म्हणून कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्यास मान्यता दिली होती. दोन वर्षांच्या कालावधीसाठी ती नियुक्ती देण्यात आली होती. आता या कार्यकाळाची मुदत संपत आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यकाळात मुदतवाढ देण्यात आली आहे.
चारा घोटाळ्याचा पर्दाफाश - खरे यांची प्रशासनिक कारकीर्द चांगलीच गाजलेली आहे. लालू प्रसाद यादव यांच्या चारा घोटाळ्याचा पर्दाफाश त्यांनीच केला होता. तर राजेश गोखले हे मूळचे नागपूरचे आहेत. त्यांचे संशोधन क्षेत्रात मोठे योगदान असून त्यांना मानाचा शांतीस्वरुप भटनागर पुरस्कारही मिळाला आहे.