अमेठी (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय राय यांनी शुक्रवारी राहुल गांधी २०२४ ची लोकसभा निवडणूक अमेठीतून लढणार असल्याचे सांगितले. यामुळे ते आता त्यांच्या कुटुंबाच्या पावलावर पाऊल ठेवत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या आधी माजी पंतप्रधान राजीव गांधी, संजय गांधी आणि सोनिया गांधी यांनी देखील येथून लोकसभा निवडणूक लढवली आहे.
2019 च्या निवडणुकीत राहुल गांधींचा पराभव : 2019 च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत अमेठी हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र २०१९ मध्ये भाजपाच्या स्मृती इराणी यांनी तेथे राहुल गांधी यांचा पराभव केला. त्याचे फळ स्मृती इराणी यांना मिळाले त्या मोदी सरकारमध्ये केंद्रीय मंत्री बनल्या. मात्र पराभवनंतरही राहुल गांधी यांचा अमेठीशी संपर्क तुटलेला नव्हता. त्यामुळे २०२४ मध्ये ते पुन्हा तेथून निवडणूक लढतील असे बोलले जात होते. आता यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
अमेठी मतदारसंघ कॉंग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे : 1971 मध्ये काँग्रेस नेत्या विद्या धर बाजपेयी अमेठी लोकसभा मतदारसंघातून विजयी झाल्या होत्या. राहुल गांधींचे काका संजय गांधी यांनी 1980 मध्ये कॉंग्रेस (I) च्या तिकिटावर ही जागा जिंकली. त्यानंतर 1980 ते 1996 पर्यंत, गांधी घराण्याचे या जागेवर वर्चस्व राहिले. राहुलचे वडील राजीव गांधी यांनी 1984 च्या सार्वत्रिक निवडणुकीत अमेठीतून विजय मिळवला. त्यानंतर 1989 आणि 1991 च्या लोकसभा निवडणुकीत ते पुन्हा विजय मिळवण्यात यशस्वी झाले. 1991 मध्ये राजीव गांधींच्या हत्येनंतर झालेल्या पोटनिवडणुकीत, सहानुभूतीच्या लाटेत काँग्रेसचे सतीश शर्मा विजयी झाले. त्यानंतर शर्मा यांनी 1996 च्या लोकसभा निवडणुकीतही ही जागा आपल्याकडे कायम राखली.
राहुल गांधी यांनी विजयाची हॅट्रिक साधली : 1998 च्या निवडणुकीत भाजपाने कॉंग्रेसच्या या बालेकिल्ल्याला सर्वप्रथम सुरूंग लावला. त्या निवडणुकीत भाजपाचे संजय शर्मा अमेठीतून विजयी झाले. मात्र 1999 मध्ये राहुल गांधी यांच्या आई सोनिया गांधी यांनी तेथे विजय मिळवत ही जागा पुन्हा एकदा गांधी घरण्याकडे खेचून आणली. त्यानंतर 2004 मध्ये राहुल गांधी यांनी राजकारणात उडी घेतली. ते अमेठी येथून निवडणूक लढले आणि तेथून विजय प्राप्त केला. त्यानंतर त्यांनी 2009 आणि 2014 मध्येही येथून विजय मिळवत हॅट्रिक साधली.
राहुल चौथ्यांदा विजयी होतील का? : 2019 मध्येही त्यांनी त्याच मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, पण नंतर त्यांना स्मृती इराणी यांच्याकडून पराभव पत्कारावा लागला. आता राहुल गांधी पुन्हा एकदा अमेठी मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट करत उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय राय यांनी पुन्हा एकदा लढाईची रेषा आखली आहे. आता राहुल गांधी तेथून चौथ्यांदा विजयी होतील की नाही हे पाहाणे महत्वाचे आहे.
हेही वाचा :