चंदिगढ : हरियाणामध्ये एका कोरोना रुग्णाला घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका चालकाने तब्बल १ लाख २० हजार रुपये मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. रुग्णाच्या नातेवाईकांनी याबाबत आरोप केला आहे.
गुरुग्राममधील एका कोरोना रुग्णाला लुधियानाला घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिकेचा शोध सुरू होता. रुग्णाच्या नातेवाईकांना एक रुग्णवाहिका मिळालीही. मात्र चालकाने रुग्णाला नेण्यासाठी मागितलेली रक्कम ऐकून रुग्णाच्या नातेवाईकांना धक्का बसला. याप्रकरणी या कुटुंबीयांनी जिल्हा प्रशासनाकडे तक्रार नोंदवली आहे.
हेल्पलाईनवर उत्तर मिळाले नाही..
रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णवाहिकेसाठी जिल्हा प्रशासनाने जारी केलेल्या हेल्पलाईन नंबरवरही कित्येक वेळा फोन करुन पाहिला. मात्र तो फोन कोणीही उचलला नाही. प्रशासनाने दिलेल्या नंबरवरील फोन कोणी उचलला नसल्यामुळेच आम्हाला दुसरीकडून रुग्णवाहिकेचा बंदोबस्त करावा लागला, अशी माहिती रुग्णाच्या नातेवाईकांनी दिली.
दरम्यान, याप्रकरणी रुग्णवाहिका पुरवणाऱ्या कंपनीने चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे. यामध्ये चालक दोषी आढळल्यास त्यावर कडक कारवाई करु, असेही या कंपनीने स्पष्ट केले आहे.
हेही वाचा : गुजरातहून 'रेमडेसिवीर' घेऊन येणार विमान ग्वाल्हेर विमानतळावर कोसळले