धार (मध्य प्रदेश) - लग्न म्हटलं की बँण्ड-बाजा, दागिने, मोठा हॉल आणि शेकडो लोकांना आमंत्रित करून लाखो रुपयांची उधळण. समाजात आपण असे अनेक उदाहरणं बघतो की, कर्जबाजारी होऊन थाटात लग्नसोहळे केले जातात. यात गरिब-श्रीमंत सगळेच. परंतु काही लग्नसोहळे असेही होतात, की ते समाजापुढे आदर्श घालून देतात. असाच एक लग्नसोहळा मध्य प्रदेशातील धार शहरात सोमवारी पार पडला. उपविभागीय अधिकारी (SDO) शिवांगी आणि लष्करात मेजर पदावर असलेल्या अनिकेत यांचा. कोणताही थाट न करता फुलमाळा आणि मिठाईवर केवळ पाचशे रुपये खर्च करून हा विवाह संपन्न झाला. लग्नानंतर रीतसर विवाह नोंदणी करण्यात आली.
कोरोनामुळे लग्न लांबणीवर -
शिवांगी जोशी यांचं भोपाळ हे मूळगाव आहे. शिवांगी या धार शहरात उपविभागीय अधिकारी या पदावर कार्यरत आहेत. तर अनिकेत चतुर्वेदी हे मूळ भोपाळचे आणि सध्या लद्दाख येथे लष्करात मेजर पदावर कार्यरत आहे. दोघेही मोठ्या पदावर आहेत. कोरोनामुळे दोन वर्षापासून लग्न लांबणीवर होतं. शिवांगी आणि अनिकेतने समाजात आदर्श घालून देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर नातेवाईकांची परवानगी घेऊन धार येथील न्यायालय परिसरात कोणताही थाट आणि पैशाची नासाडी न करता साधेपणानं लग्न केले.
नागरिकांनी लग्नात नियम पाळायला हवे -
उपविभागीय अधिकारी शिवांगी जोशी म्हणतात, मागील दोन वर्षापासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. कोरोना योद्धा असल्याचे मानून आणि सर्व नियम पाळून एक आदर्श घालून देणं गरजेचे वाटले. त्यामुळे सर्व नागरिकांनी देखील व्यर्थ खर्च टाळून आणि कोणतीही गर्दी न करता लग्नसोहळे पार पाडावेत. तसेच मी आधीपासूनच या गोष्टींवर होत असलेल्या खर्चाच्या विरोधात आहे. या खर्चाचा भार मुलींकडच्या लोकांवर जास्त पडतो. तसेच पैशाची नासाडी होते, असेही त्या म्हणाल्या. या विवाह सोहळ्यात जिल्हाधिकारी आलोक कुमार सिंह, उपविभागीय अधिकारी सलोनी सिडाना यांच्यासह इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.